महाराणी एलिझाबेथ यांना करोनाची लागण

लंडन – ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. या संसर्गाची अत्यंत सौम्य लक्षणे सध्या त्या अनुभवत आहेत, असे बकिंगहॅम पॅलेसच्या सूत्रांनी सांगितले.
महाराणी एलिझाबेथ यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सध्या विंडसर राजप्रासादात वास्तव्याला आहेत. पुढील काही दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. योग्य वैद्यकीय उपचारांबरोबर सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन त्यांच्यासाठी केले जाणार आहे, असे राजवाड्याच्या सूत्रांनी सांगितले.
महाराणींना करोना विरोधी लसीचे तीन डोस घेतलेले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याशिवाय त्या स्वतः सर्व नियमांचे काटेकोर पालन करत आहेत, असेही विंडसर पॅलेसने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अलिकडेच 95 वर्षीय महाराणी एलिझाबेथ या ब्रिटनच्या सर्वाधिक काळ राजपदावर राहिलेल्या व्यक्ती ठरल्या आहेत. यावर्षी 6 फेब्रुवारीला त्यांच्या महाराणी पदाला 70 वर्षे पूर्ण झाली आहेत.
ब्रिटनमध्ये सध्या लागू असलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला 10 दिवस विलगीकरणात रहावे लागते. मात्र या 10 दिवसांपैकी सहाव्या आणि सातव्या या सलग दिवशी केलेल्या चाचण्या निगेटिव्ह आल्या तरच त्या व्यक्तीला विलगीकरणात राहण्यापासून सूट मिळू शकते.
महाराणींचे पुत्र आणि युवराज चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी कॅमिला यांनाही या महिन्याच्या प्रारंभीच करोनाचा संसर्ग झाला आहे.





