नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा निश्चित झाला आहे. ते दोन दिवसीय दौऱ्यासाठी ४ डिसेंबरला भारतात दाखल होतील. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पुतीन यांच्या दौऱ्याविषयीची औपचारिक घोषणा केली आहे. भारत आणि रशियामध्ये २३ वी वार्षिक शिखर परिषद होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात महत्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होईल. संबंधित परिषदेसाठी मोदींनी दिलेले निमंत्रण स्वीकारत पुतीन भारत दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचा दौरा भारत आणि रशियातील मैत्रीपूर्ण संबंध आणखी बळकट होण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. शिखर परिषदेतून अतिशय सकारात्मक फलनिष्पत्ती मिळण्याचा विश्वास दोन्ही देशांकडून व्यक्त केला जात आहे.