उलानबाटर : युक्रेनवरील आक्रमणादरम्यान युद्धगुन्ह्यांच्या आरोपाखाली पुतीन यांच्याविरोधात ज्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने वॉरंट बजावले आहे, त्याच न्यायालयाचे सदस्य असलेल्या मंगोलियामध्ये पुतीन यांनी आज बिनधास्त भेट दिली. आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वॉरंटनुसार अटक केली जाईल, अशी जरासुद्ध भीती पुतीन यांना या भेटीदरम्यान जाणवली नाही.
मंगोलियात आल्यावर उलानबाटर येथील चौकात परंपरागत पद्धतीने स्वागत करण्यात आले. मंगोल साम्राज्याची स्थापना करणाऱ्या चेंगिस खानच्या सैन्याच्या वेशभुषेसारखा गणवेश असलेल्या लष्करी तुकडीकडून त्यांना मानवंदना देखील देण्यात आली. मंगोलियाचे अध्यक्ष खुरेलसुख उखाना यांच्याशी पुतीन यांची चर्चा देखील झाली. दोन्ही देशांमधील संबंध सर्व क्षेत्रांमध्ये विकसित होत आहेत, असे सांगून पुतीन यांनी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदसाठी खुरेलसुख यांना निमंत्रण देखील दिले.
युक्रेनविरोधात रशियाने युद्ध पुकारल्यापासून पुतीन प्रथमच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या सदस्यत्व असलेल्या एखाद्या देशाच्या भेटीवर गेले आहेत. पुतीन मंगोलियाला जाण्यापूर्वीच युक्रेनने पुतीन यांना अटक करून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या स्वाधीन करण्याची मागणी मंगोलियाकडे केली होती. मात्र मंगोलियाकडून या वॉरंटची अंमलबजावणी होऊ शकणार नाही, अशी चिंता युरोपीय संघाने देखील व्यक्त केली होती. जपानवर सोव्हिएत आणि मंगोलियाच्या सैन्याने मिळवलेल्या विजयाच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पुतीन मंगोलियात आले आहेत.
पुतीन यांच्याविरोधात निदर्शने करण्याचा प्रयत्न
स्वागत समारंभापूर्वी एका गटाने हातात युक्रेनचे ध्वज घेन पुतीन यांच्याविरोधात निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्वरित हालचाली करून या निदर्शकांना तेथून दूर हटवले.पुतीन यांना अटक करावी, अशी मागणी करणारे रशियाबाहेरील ५० रशियाच्या नागरिकांनी स्वाक्षऱ्या केलेल्या एका खुल्या पत्राद्वारे मंगोलियाला आवाहन करण्यात आले होते. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव दिमित्री मेडवेदेव यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे वॉरंट रशियाने धुडकावल्याचे उघडपणे सांगूनही टाकले आहे.