पुणे – जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोविशिल्ड बरोबरच कोव्हॅक्सिनची देखील लस देण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणती लस दिली जाणार, याबाबत लसीकरण केंद्राच्या दर्शनी भागात फलक लावण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्र प्रमुखांना दिले आहेत. लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर कोव्हॅक्सिन लस ही केवळ जिल्हा रुग्णालयामध्येच देण्यात आली. परंतु, लस उपलब्धतेनुसार शहरासह ग्रामीण भागातील इतर केंद्रावर देखील कोवॅक्सिन देण्यास सुरूवात केली. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांना सोमवारी 35 हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामधील 20 हजार कोविशिल्डचे तर 15 हे कोव्हॅक्सिनचे डोस आहेत. ग्रामीण भागात सध्या सुमारे 114 केंद्रावर लसीकरण सुरू आहे. या प्रत्येक केंद्रांना सोमवारी संध्याकाळी 35 हजार डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. नागरिकांना तुम्ही कोणती लस घेत आहात, याची माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय अनेकदा नागरिकांकडून याबाबत विचारणा केली जाते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.