Pushpa 2 in Japan : टोकियोत रश्मिका मंदानाला मिळालं ‘खरं प्रेम’, चाहत्यांची पत्रं वाचून झाली भावूक

Pushpa 2 in Japan: भारतीय सिनेमाचा प्रभाव आता सातासमुद्रापारही ठळकपणे दिसू लागला आहे. २०२४ मधील ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरलेला ‘पुष्पा 2 : द रूल’ आता आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना नुकतेच जपानची राजधानी टोकियो येथे पोहोचले होते. १६ जानेवारी २०२६ रोजी जपानमध्ये झालेल्या रिलीजवेळी मिळालेल्या जबरदस्त स्वागताने रश्मिका अक्षरशः भावूक झाली आहे.
जपानी चाहत्यांच्या प्रेमाने रश्मिका भारावली
जपानमधील चाहत्यांच प्रेम आणि त्यांनी दिलेली भेटवस्तू रश्मिकाच्या मनात खास जागा करून गेली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रश्मिकाने आपल्या या छोटेखानी पण अविस्मरणीय दौऱ्याचा अनुभव सांगितला. “मी फक्त एका दिवसासाठी जपानमध्ये होते, पण मला जे प्रेम मिळालं ते अगदी खरं आणि मनापासून होतं,” असं तिनं म्हटलं आहे.
पत्रांनी पाणावले डोळे
प्रमोशनदरम्यान जपानी चाहत्यांनी रश्मिकाला हाताने लिहिलेली अनेक पत्रं आणि सुंदर कलाकृती भेट म्हणून दिल्या. भारतात परतल्यानंतर ही पत्रं वाचताना रश्मिका भावूक झाली. इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत तिनं लिहिलं, “मी प्रत्येक पत्र वाचलं आहे आणि प्रत्येक भेट जपून ठेवली आहे. हे सगळं पाहून माझे डोळे पाणावले.”
View this post on Instagram
रश्मिकाचं वचन… पुन्हा जपानला येणार
जपानमधील अनुभवाने भारावलेल्या रश्मिकाने चाहत्यांना खास वचन दिलं आहे. “मी नक्कीच पुन्हा जपानला येईन. पुढच्या वेळी जास्त वेळ तिथे घालवेन आणि येण्याआधी जपानी भाषा अधिक चांगल्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करेन,” असं तिनं सांगितलं. तिच्या या साधेपणामुळे आंतरराष्ट्रीय चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
टोकियोत ‘पुष्पा’ची धूम
टोकियोतील कार्यक्रमाचे फोटो यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये रश्मिका आणि अल्लू अर्जुन ‘पुष्पा’चा सिग्नेचर पोज देताना दिसले. ‘पुष्पा 2’चा जपानी ट्रेलरही सध्या चर्चेत असून, रश्मिकाच्या ‘श्रीवल्ली’ पात्राला जपानी आवाज देण्यात आला आहे. ‘आरआरआर’ नंतर आता ‘पुष्पा 2’ जपानमध्येही नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





