मुंबई : शेअर बाजारात सकाळच्या सत्रात व्यापार करारासंदर्भात संभ्रम कायम होता. त्यामुळे गुंतवणूकदार कुंपणावर बसून होते. दुपारच्या सत्रात काही धाडसी गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी केल्यामुळे निर्देशांकात थोडीफार वाढ होण्यास मदत झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 270 अंकांनी वाढून 83,712 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 61 अंकांनी म्हणजे 0.24 टक्क्यांनी वाढून 25,522 अंकावर बंद झाला. कालच्याप्रमाणे आजही शेअर बाजारात संभ्रमाचे वातावरण होते. अमेरिकेने व्यापार करार करण्यासाठीची मुदत 9 जुलैपासून एक ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. मात्र तरीही भारत- अमेरिका व्यापार कराराबाबत स्पष्ट माहिती पुढे येत नसल्यामुळे देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना खरेदी- विक्रीचे निर्णय घेणे अवघड झाले असल्याचे विश्लेषकानी सांगितले. कोटक महिंद्रा, इटर्नल, एशियन पेंटस्, एनटीपीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स. अदानी पोर्टस, इन्फोसिस, स्टेट बँकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र टायटन, ट्रेन्ट, अॅक्सिस बँक, मारुती, हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान, कोरियासह बर्याच मित्र राष्ट्राच्या विरोधात एकतर्फी आयात शुल्क जाहीर केल्यानंतर सोमवारी अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले होते. जपान आणि इतर आशियाई देशाच्या शेअर बाजारावर परिणाम झाला होता. मात्र दक्षिण कोरिया, जपान, शांघाय आणि हाँगकाँग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले होते. दरम्यान या परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदारांना निर्णय घेणे अवघड झाले आहे. मात्र काल या गुंतवणूकदारांनी 321 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्याचबरोबर देशातील संस्थागत गुंतवणूकदारानी तब्बल 1,853 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशांकांना आधार दिला. काल शेअर बाजाराचे निर्देशांक स्थिर राहिले होते.