रेडा – इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवार (दि.29) पासून मका खरेद्री केंद्र सुरू होणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली जाणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
मका शेतमाल हमीभावात (आधारभूतदराने) खरेदीकरिता मार्केटिंग फेडरेशन व इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघ लि, इंदापूर यांचे सहकार्याने बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमधील कार्यालयात ही नोंदणी सुरू होणार आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी 7/12 उताऱ्याची मूळप्रत, पीक पेरा (2019 -20 मका नोंद आवश्यक), आधारकार्ड, झेरॉक्स, बॅंक खाते पासबुक झेरॉक्स व मोबाइल नंबरसह मका विक्रीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
नोंदणीनंतर सरकारी धोरणानुसार शेतमाल आधारभूत दरात खरेदी शेतकऱ्यांचा मक्यास एकरी 9.50 क्विंटल पीक-पाणी पाहून खरेदी केली जाणार आहे, तरी शेतकरी बांधवांनी मका शेतमालपूर्ण वाळलेला, स्वच्छ व एफ-क्यू दर्जाचे विक्रीस आणून सहकार्य करावे, असे आवाहन जगदाळे यांनी केले आहे.
यावेळी उपसभापती यशवंतराव माने, सहसचिव वैभव दोशी, संचालक मधुकर भरणे, दत्तात्रय सपकळ, संतोष वाबळे, अनिल बागल, संग्रामसिंह निंबाळकर, दत्तात्रय फडतरे, गणेशकुमार झगडे, शिवाजी इजगुडे, निर्मला रणमोडे, स्वाती सपकळ, आबा देवकाते, रोहित मोहोळकर, सचिन देवकर, सुभाष दिवसे, मेघशाम पाटील, महावीर गांधी, भानुदास सपकळ उपस्थित होते.