पुणे जिल्हा | शैक्षणिक साहित्य खरेदीची लगबग सुरूच

इंदापूर, (प्रतिनिधी) – नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे.त्यामुळे नवीन अॅॅडमिशन घेतलेले विद्यार्थी, पालक वर्ग पाठ्यपुस्तके, वह्या, पेन, दप्तर, कंपॉस पेटी, गणवेश, बुट व पायमोजे आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीस इंदापूर, निमगाव केतकी, वालचंदनगर, भिगवण येथे विविध दुकानांवर पालकांची व विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे, इंदापूर तालुक्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यावयाच्या शिकवणी सुरू झाली आहे.
त्यासाठी लागणारे सर्व साहित्याच्या खरेदीसाठी पालक व विद्यार्थी शहरातील विविध, शैक्षणिक साहित्याच्या दुकानांवर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्रामीण भागातील पालक खरेदीसाठी शहरात येत आहेत.
आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती दिवसेंदिवस वाढविण्यासाठी,आणि त्याच्या शैक्षणिक दर्जात कुठेही कमी पडता कामा नये.
यासाठी पाल्यास आवश्यक असणार्या सर्व साहित्याची शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस खरेदी करण्यास तालुक्याचे ठिकाण असणार्या इंदापूर शहरात, तसेच निमगाव केतकी, भिगवण, बावडा अशा मोठ्या गावात ग्रामीण भागातून पालक शहरातील शैक्षणिक साहित्य विक्रीच्या दुकानातून साहित्य खरेदी करण्यास येत आहेत.
बळीराजा कर्जाच्या बोजाखाली दबला
इयत्ता पहिलीपासूनच पदवीपर्यंत विद्यार्थ्यांच्या पुस्तके, वह्यांच्या किमती गगनाला भिडलेले आहेत. मागील काही वर्षापासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.
त्यातच पहिल्यांदाच पावसाने मृग नक्षत्रापासून सुरुवात केल्याने शेतीतील मेहनतीचा खर्च बियांचा खर्च व खते असा मोठा खर्च शेतकर्यांना उसनेवारी करून करावा लागत असून त्यातच शैक्षणिक साहित्य खरेदीसाही ही उसनवारी करावी लागत असल्याने बळीराजा कर्जाच्या बोजाखाली दबला जात आहे.





