प्रभात वृत्तसेवा वाल्हे – !! धन्य धन्य ज्ञानेश्वरा अलंकापुरी समाधी स्थिरा !! कृष्ण पक्षी तुझ निर्धारा.मी भेटी देत जाईल!! ही भावना मनी ठेऊन कपाळी बुक्का, गंध लावून, खांद्यावर भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आज आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींच्या वाल्हेनगरीत, “ज्ञानबा-तुकाराम” चा जयघोष करीत, श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून आळंदीकडे मार्गस्थ झालेल्या श्री पांडूरंग पालखी सोहळा व संत नामदेव महाराज पालखी सोहळा रविवार (दि.९) वाल्हे (ता. पुरंदर) येथे विसावला. विठ्ठल महाराज वासकर, व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या वतीने हा पालखी सोहळा मागील अकरा वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर निरा नदीवरील दत्तघाटावर पांडुरंगाच्या पादुकांना पवित्र स्नान घालून, दुपारची विश्रांती घेऊन, पालखी सोहळा महर्षि वाल्मिकींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावरती सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान विसावला. यावेळी, सोहळा प्रमुख विठ्ठल (दादा) तात्यासाहेब वासकर, ॠषी महाराज वासकर, चैतन्य महाराज वासकर, विठ्ठल – रुक्मिणी पालखी सोहळा व्यवस्थापक कुलदीप कुलकर्णी, अनिरुद्ध कुलकर्णी आदींसह वैष्णव उपस्थित होते. दरम्यान, पांडुरंग महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत वाल्हेकर ग्रामस्थांच्या वतीने, सरपंच अतुल गायकवाड यांनी केले. यावेळी, माजी सरपंच दत्तात्रेय पवार आदींसह ग्रामस्थांनी स्वागत केले.यावेळी, टाळ मृदुंगाचा गजर ज्ञानदेव तुकारामांच्या जयजयकाराने संपूर्ण पालखीतळ भक्तिमय झाला होता. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये समाज आरती झाली.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येत समाज आरतीस उपस्थित होते. सासवडला आज मार्गस्थ होणार.. सोमवार (दि.१०) पहाटे ३ वाजता पालखी सोहळा सासवड मुक्कामी मार्गस्थ होणार असल्याची माहिती पालखी सोहळा संपर्क प्रमुख मेघराज वाळके-पाटील यांनी दिली. दरम्यान, पालखी सोहळ्याकरिता पंढरपूरपासून आळंदीपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज ट्रस्ट व पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्याकडून पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सोहळा मालक नामदास महाराज यांनी दिली.