Purandar News – पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे सावित्री ज्योती जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यातील तब्बल दीड डझन मंत्री, खासदार, आमदार, उच्चपदस्थ अधिकारी उत्साहात दाखल झाले; मात्र, भव्य कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाची काळी किनार लाभली. रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता, मंत्र्यांनाही अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागला आणि प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सासवड ते खानवडी मुख्य मार्गावरून मंत्र्यांचा ताफा जाणार असल्याची माहिती दीड महिन्यांपूर्वीपासून प्रशासनाला होती. तरीदेखील या मार्गावरील कामे संथगतीने सुरू होती. सासवड- सुपा रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांमधून मार्ग काढावा लागत होता. काहीनी पर्यायी मार्ग म्हणून कुंभारवळण- एखतपूर- मुंजवडी- खानवडी हा रस्ता निवडला; मात्र, या मार्गाची स्थिती देखील काही वेगळी नव्हती. सर्वच रस्ते खड्ड्यांनी भरलेले असल्याने प्रवास त्रासदायक ठरला. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या. किमान सासवड ते कुंभारवळण हा महत्त्वाचा रस्ता डांबरीकरण करून तयार ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत केराची टोपली दाखवली, अशी जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. सावित्री ज्योती शाळेच्या उद्घाटनाला उपस्थित मंत्री. झेंडेवाडी ते वाळुंज मार्गावरही मोठमोठे खड्डे पडलेले असताना त्यांची डागडुजीसुद्धा केली नाही. या परिस्थितीमुळे कार्यक्रमासाठी आलेल्या व्हीआयपी पाहुण्यांचे कंबरडे मोडले, अशी उपरोधिक चर्चा रंगली आहे. अनेकांना प्रवासादरम्यान मोठा त्रास सहन करावा लागला. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाचा हा निष्काळजीपणा उघडपणे समोर आला आहे. छगन भुजबळांची नाराजी मंत्री छगन भुजबळ यांनी खानवडी ते एखतपूर या रस्त्यावरून माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांच्या निवासस्थानी जाताना रस्त्यांची दुर्दशा प्रत्यक्ष पाहिली. रस्त्यांची वाईट अवस्था पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या नाराजीमुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशी कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, दादा भुसे, मंगलप्रभात लोढा, जयकुमार गोरे, योगेश कदम, अतुल सावे, दत्ता भरणे, आदिती तटकरे, राहुल कुल, अण्णा बनसोडे, मेधा कुलकर्णी, शंकर मांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य स्तरावरचा कार्यक्रम असूनही मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरले, ही बाब गंभीर मानली जात आहे. विकासाच्या घोषणा आणि दुसरीकडे प्रत्यक्षात खड्ड्यांनी भरलेले रस्ते या विरोधाभासामुळे संतापाची लाट उसळली आहे. बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारावर कठोर कारवाईची गरज आहे.