प्रभात वत्तसेवा दिवे – पुरंदर तालुक्यात सुमारे ७५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले असून ६१ किलोमीटर चे रस्ते तयार झाले आहेत. यामुळे वेगवेगळ्या वाडी वस्तीवरील सुमारे १५१३ नागरिकांना याचा उपयोग होणार आहे एकूणच ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांना आता खऱ्या अर्थाने कायदेशीर आधार मिळाल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत येण्याजाण्या साठी मोठी सुलभता येणार आहे. अशी माहिती तहसीलदार विक्रम राजपूत आणि नायब तहसीलदार संदीप पाटील यांनी दिली आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतात अथवा शेतातील वस्तीवर जाण्यासाठी पूर्वीपासून पाणंद रस्ते, शेत रस्ते, शिव रस्ते, गाडी रस्ते तयार केले. अनेक पिढ्या त्या रस्त्यावरून पायवाट करीत असताना जमिनीच्या किमती वाढल्या आणि काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या पायवाटा अतिक्रमण करून बंद केल्या. संबंधित शेतकरी रस्ते खुले करण्यासाठी वर्षानुवर्षे पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजवूनही रस्ते मोकळे होत नव्हते. मात्र शासनाने याची गांभीर्याने दखल घेवून ग्रामीण रस्ते खुले केल्यानंतर शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर इतर हक्कात नोंद केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे पाणंद रस्त्यांना खऱ्या अर्थाने संरक्षण प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने सुरुवातीच्या १०० दिवसांचा सात कलमी जाहीर केला होता. यामध्ये ग्रामीण भागातील पाणंद रस्ते, शेतरस्ते, शिवरस्ते, गाडीरस्ते करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला होता. सरपंच, प्रतिष्ठीत पुढारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर रस्त्यांची जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या प्रयत्नाने रस्ते खुले होत नसल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअधिक्षक भूमी अभिलेख व पोलीस निरीक्षक यांच्या मदतीने रस्ते खुले करून देण्याच्या स्पष्ट सूचना होत्या. ग्रामीण भागातील रस्त्यांचे नकाशे तयार करणे, नकाशातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग हे प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करणे. भूमापन क्रमांकातून बंद रस्ते जातात. त्या भोगवटा धारकांची यादी तयार करणे. सर्व प्रयत्नानंतरही रस्ता खुला होत नसल्यास उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचे सहायाने रस्ता निश्चित करुन पोलीसांचे सहायाने तो खुला करावा, अशा सूचना दिल्या होत्या.रस्ता खुला न झालेल्या प्रकरणांमध्ये तहसीलदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ व महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम१४३ अन्वये अर्ज प्राप्त करुन घेऊन तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपअधिक्षक भूमी अभिलेख व पोलीस निरीक्षक यांनी गाडी मार्ग (पोटखराब) पायमार्ग कालबध्द रितीने खुले करावे. अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुरंदर तालुक्यात प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत आणि भूमीअभिलेख विभागाच्या अधीक्षक स्मिता गौड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापक मोहीम राबवली. गावोगावी ग्रामसभा घेवून रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सूचना देवून प्रस्ताव मागवले. अधिकाऱ्यांच्या आवाहनाला तालुक्यातील अनेक गावांनी प्रतिसाद देत पाणंद रस्ते खुले करावेत अशा मागण्या केल्या होत्या. वनपुरीच्या पाणंद रस्त्याने जिल्ह्याला दिला आदर्श.. पुरंदर तालुक्यातील वनपुरी गावठाणपासून महादेव बंडू गायकवाड वस्तीपर्यंत सुमारे दोन ते अडीच किलोमीटरचा पाणंद रस्त्या महसूल, भूमी अभिलेख आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने मोकळा केला. तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडलाधिकाऱ्यांनी त्या रस्त्याची संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावरील इतर हक्कात नोंद करून रस्त्याला खऱ्या अर्थाने हक्क प्रदान केले. पुरंदरबरोबरच जिल्ह्यातील पहिल्याच रस्त्याची अशा प्रकारे नोंद झाल्याने जिल्ह्यासाठी एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणात नोंदी करण्यासाठी गावोगावच्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल केल्याची माहिती प्रशासनाकडून दिली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण.. पाणंद रस्त्याची शेतकऱ्यांच्या सातबारा उताराच्या इतर हक्कात नोंद केल्याने रस्त्यांना मोठा आधार मिळाला आहे. त्याचबरोबर भविष्यात कोणत्याही प्रकारे अतिक्रमण होऊ नये, यासाठी शासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील अतिक्रमणमुक्त करण्यात येणाऱ्या पाणंद रस्त्याची सातबारा उतारावर इतर हक्कात नोंद करण्यात येणार. रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे एकदा वृक्षारोपण झाल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याला अतिक्रमण करण्यापासून कायदेशीर अटकाव होणार आहे. तरीही अतिक्रमण केले अथवा रस्त्याची दुरवस्था केला, अडवणूक केल्यास प्रशासनाला स्वतःहून गुन्हे दाखल करण्याचे महसूल मंत्र्यांनी यापूर्वीच निर्देश दिले आहेत.