हरकती-सूचनांसाठी दोन महिने मुदत
पुणे – पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या “छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचा उद्देश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने जाहीर केला आहे. त्यानुसार पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या गावातील हद्दीचे नकाशे जाहीर करण्यात आले आहे. त्यावर नागरिकांना 60 दिवसांत हरकती- सूचना नोंदविता येणार आहे.
मुंबई येथे डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना नियोजन कायदा 1966 च्या तरतुदीनुसार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना विकास योजना तयार करण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून हद्दीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. विमानतळासाठी किती क्षेत्र संपादित करावे लागणार, कोणत्या गावातील जमिनी जाणार आहे, याची सर्व्हे नंबरनिहाय माहिती या नकाशांमध्ये देण्यात आली आहे.
विमानतळ उभारण्यासाठी सुमारे 2 हजार 832 हेक्टर जागा लागणार आहे. 2 हजार हेक्टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम यापूवीच कंपनीकडून डार्स या कंपनीला देण्यात आले आहे. तर उर्वरित 832 हेक्टर जागेवर आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करण्यात येणार आहे.
येथे नोंदवा हरकती
पुरंदर विमानतळासाठीच्या सूचना व हरकती नागरिकांना नोंदविता येणार आहे. मुख्य नियोजनकार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, आठवा मजला, वर्ल्ड, ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई -5 येथील कार्यालयात हरकती देता येणार आहे.
गावनिहाय भूसंपादन होणारे संभाव्य क्षेत्र
वनपुरी – 339 हेक्टर
उदाची वाडी – 261 हेक्टर
कुंभारवळण- 351 हेक्टर
एखतपूर -217 हेक्टर
मुंजवडी – 143 हेक्टर
खानवडी – 484 हेक्टर
पारगाव- 1037 हेक्टर