पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! तरुण दिग्दर्शकांची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर

सावनी रवींद्र, अक्षय इंडीकर, विनोद कांबळे आणि नियाज मुजावर यांचा सन्मान
पुणे -आजच्या तरुणाईबाबत समाजात अनेक चर्चा सातत्याने रंगतात. मात्र, याच तरुण पिढीच्या प्रतिनिधींना “राष्ट्रीय’ चित्रपट पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. यापैकी नियाज मुजावर आणि विनोद कांबळे यांनी एफटीआयआयमध्ये लघु अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. त्यामुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सोमवारी दिल्ली येथे राष्ट्रीय चित्रपटांची घोषणा झाली. त्यापैकी गायिका सावनी रवींद्र यांना “बार्डो’ या चित्रपटासाठी “सर्वोत्कृष्ट गायिका’, दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांच्या “त्रिज्या’ चित्रपटाला “सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन’, विनोद कांबळे यांना “कस्तुरी’ चित्रपटासाठी आणि नियाज मुजावर यांना “बेस्ट फिल्म ऑन नॅशनल इंटीग्रेशन’ या विभागात “ताजमहल’ चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाले.
कामाचे चिज झाले…
मूळचे बार्शीचे असणारे विनोद कांबळे म्हणाले, “आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार कधीतरी मिळावा ही अपेक्षा असतेच. कस्तुरी’ या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणे, भारावणारे आहे. पहिले काम हे कायमच जवळचे असते, या कामाचे चिज होते. चित्रपट पाहणे सर्वांनाच आवडते, पण तेव्हापासून आपलाही चित्रपट असावा, आपण याचा भाग व्हायला हवे, असे वाटत होते. मूळात मी “सिव्हील इंजिनिअर’ आहे. चित्रपटाचे कोणतेही तांत्रिक शिक्षण मी घेतले नाही. एफटीआयआयमध्ये “फिल्म ऍप्रिसिएशन’चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. यापूर्वी लघुपट आणि नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. एका चित्रपटासाठी सहायक म्हणून काम केले होते.’
राष्ट्रीय सर्वोच्च सन्मान मिळाल्याचा आनंद
सोलापूर जिल्ह्यातील नियाज मुजावर यांनी पुरूषोत्तम आणि फिरोदिया हे करंडक पटकाविले आहेत. “पुण्यात आयएलएस लॉ कॉलेजमध्ये होते. त्यादरम्यान एफटीआयआयमध्ये पटकथा लेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तेथून चित्रपट क्षेत्रातील काम सुरू झाले. पहिल्यांदा “डिस्को सन्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. लेखक, दिग्दर्शक म्हणून “ताजमहाल’ हा दुसरा चित्रपट आहे. आपण लिहीलेल्या गोष्टीला राष्ट्रीय सर्वोच्च सन्मान मिळाल्यामुळे छान वाटत आहे’, असे त्यांनी सांगितले.





