Punjab News : पंजाब पोलिसांनी (Punjab News) शनिवारी एका मोठ्या दहशतवादी कटाचा डाव उधळून लावत विदेशी पाठबळ असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून आरडीएक्सने भरलेले अडीच किलो वजनाचे जिवंत आयईडी (आयम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) जप्त केले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी समाजमाध्यमावर या कारवाईची माहिती दिली. एसएएस नगर (मोहाली) येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेलने (एसएसओसी) गुप्तचर माहितीच्या आधारे ही धडक मोहीम राबवली. जप्त करण्यात आलेले आयईडी अत्यंत घातक असून त्यात रिमोट आणि टायमर अशा दोन्ही प्रकारच्या स्फोटक यंत्रणांचा वापर करण्यात आला होता. याशिवाय, आरोपींकडून एक ग्लॉक बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी परदेशातील हस्तकांच्या सूचनेनुसार काम करत होते. त्यांनी स्फोटकांची ही खेप सुरक्षित स्थळावरून ताब्यात घेतली होती आणि पुढील आदेशाची वाट पाहत ते शहीद भगतसिंग (एसबीएस) नगर बायपासजवळ लपवून ठेवले होते. याप्रकरणी पोलिसांनी स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. हे दहशतवादी जाळे पूर्णपणे मुळासकट उखडून टाकण्यासाठी आणि या कटामागील आर्थिक रसद व पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सध्या कसून चौकशी करत आहेत.