Bomb Threat : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासह विधानसभा बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Bomb Threat : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निवासस्थान, पंजाब विधानसभा आणि सिव्हिल सचिवालय बॉम्बने उडवण्याची ई-मेलद्वारे धमकी. पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा अलर्ट.

Bomb Threat : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निवासस्थान, पंजाब विधानसभा आणि पंजाब-हरियाणा सिव्हिल सचिवालय बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने सोमवारी चंदीगडमध्ये खळबळ उडाली. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या आहेत.
धमकीची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कळवण्यात आले. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक पथक, ऑपरेशन सेल, अग्निशमन दल, मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्स टीम (MFT), रुग्णवाहिका आणि सिव्हिल डिफेन्सच्या पथकांनाही पाचारण करण्यात आले.
पोलिसांकडून तपास सुरू –
धमकी मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून परिसराची तपासणी सुरू करण्यात आली. सेक्टर-3 पोलीस ठाण्याचे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे.
धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि तो कोणी पाठवला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. बॉम्ब स्क्वॉडनेही संबंधित ठिकाणांची तपासणी केली आहे.
दरम्यान, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर पथके घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आली. सेक्टर-3 पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.
ही धमकी खरी आहे की केवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ई-मेल पाठवण्यात आला, हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून सध्या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.





