‘आप”ही इतरांप्रमाणेच? पंजाब मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांवर गुन्हे; 9 कोट्यधीश

नवी दिल्ली : पंजाबमध्ये सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाने आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहो. नव्या मंत्रीमडळात शपथ घेतलेल्या 11 पैकी 7 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी चार गंभीर आरोपांचा सामना करत आहेत. त्यामुळे ‘आप’ही इतर पक्षांप्रमाणेच आपलं राजकारण करणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या 11 मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे. पंजाब इलेक्शन वॉच आणि एडीआरने मुख्यमंत्र्यांसह सर्व 11 मंत्र्यांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केले.
एडीआरने सांगितले की, सात मंत्र्यांवर (64 टक्के) फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी चार जणांविरुद्ध (36 टक्के) गंभीर गुन्हे दाखल आहेत. या 11 मंत्र्यांपैकी 9 मंत्री कोट्यधीश असून त्यांची सरासरी संपत्ती 2.87 कोटी रुपये आहे.
होशियारपूरचे ब्रह्म शंकर (झिम्पा) सर्वाधिक संपत्ती असलेले मंत्री आहेत. त्यांच्याकडे 8.56 कोटी रुपयांची संपत्ती आहे. भोवा (SC) मतदारसंघातील लाल चंद यांची सर्वात कमी घोषित संपत्ती 6.19 लाख रुपये आहे. नऊ मंत्र्यांनी तर त्यांचं देणंही जाहीर केलं आहे. सर्वाधिक कर्ज अर्थात देणं मंत्री ब्रह्म शंकर यांच्याकडे 1.08 कोटी रुपये आहे.
एडीआरने म्हटलं, की पाच मंत्र्यांनी (45 टक्के) त्यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी आणि 12वी दरम्यान घोषित केली आहे. तर उर्वरित पदवीधर किंवा त्याहून अधिक शिक्षीत आहेत. सहा मंत्र्यांनी (55 टक्के) त्यांचे वय 31 ते 50 वर्षांच्या दरम्यान असल्याचं घोषित केले आहे, तर पाच (45 टक्के) 51 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहेत.
आम आदमी पक्षाच्या (आप) 10 आमदारांनी शनिवारी पंजाबच्या मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये हरपाल सिंग चीमा, हरभजन सिंग, डॉ. विजय सिंगला, लाल चंद, गुरमीत सिंग मीत हेअर, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रह्म शंकर, हरजोत सिंग बैंस आणि डॉ. बलजीत कौर यांचा समावेश आहे.



