#IPL2019 : पंजाबचा दिल्लीवर 14 धावांनी विजय

मोहाली – सॅम करनच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 14 धावांनी पराभव करत आगेकूच नोंदवली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 166 धावांची मजल मारून दिल्लीसमोर विजयासाठी 167 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना दिल्लीचा डाव 152 धावांवरच संपुष्टात आल्याने दिल्लीने सामना गमावला.

प्रत्युत्तरात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने दुसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र, अय्यर परतल्यानंतर धवनही लागलीच परतला. यानंतर ऋषभ पंत आणि कॉलिन इन्ग्रामने चौथ्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी करत विजयाची आशा जागवली. मात्र, हे दोघे परतल्यानंतर इतर फलंदाज केवळ हजेरीवीर ठरल्याने दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी सॅम करनने केवळ 11 धावा देत 4 गडी बाद केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची तीन षटकांत 2 बाद 36 धावा अशी स्थिती झाली होती. मयंक अग्रवाल देखील लागलीच परतला. यानंतर सर्फराज खान आणि डेव्हिड मिलर यांनी आक्रमक खेळी केली. त्यांच्या खेळीमुळे पंजाबने 12व्या षटकांत शतकी मजल मारली.

यावेळी सर्फराज सोबत डेव्हिड मिलरनेही फटकेबाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मात्र, सर्फराज 39 धावा तर मिलर 43 धावा करून बाद झाले. दोघे बाद झाल्यानंतर इतर फलंदाज केवळ हजेरीवीराची भूमिका बजावत असताना मनदीप सिंगने फटकेबाजी करत पंजाबला 166 धावांची मजल मारून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.