Nagar | धनादेश न वटल्याने आरोपीस शिक्षा

नगर, (प्रतिनिधी) – वाहन खरेदीच्या व्यवहारापोटी दिलेल्या धनादेश न वटल्याने न्यायालयाने आरोपी तुकाराम बोरुडे यांना दोषीधरून चार महिन्याचा सश्रम कारावास व नुकसान भरपाई म्हणून २ लाख २१ हजार देण्याची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादीतर्फे अॅड. आशिष एस. सुसरे यांनी काम पाहिले.
फिर्यादी अशोक शिंदे यांनी वाहन खरेदीच्या व्यवहारापोटी आरोपी तुकाराम बोरुडे यांना ४ लाख रुपये रोख रक्कम दिलेली होती. परंतु आरोपी याने सदरील वाहन विक्रीचा व्यवहार पूर्ण न करता रक्कम रुपये ४ लाख पैकी प्रत्येकी १ लाख रुपयाचे दोन धनादेश स्वरूपात दिले होते.
फिर्यादी यांनी सदरील धनादेश त्यांच्या स्वतःच्या खात्यात जमा केले असता, धनादेश आरोपींच्या खात्यात अपुरा निधी कारणांनी वटला नाही व धनादेश परत आला.
फिर्यादी यांनी आरोपीला नोटीस पाठवली, परंतु आरोपीने सदरील नोटीस स्वीकारण्यास जाणीवपूर्वक नकार दिला म्हणून फिर्यादीने आरोपी विरुद्ध अहमदनगर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी साहेब यांचे न्यायालयात दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी धनादेश न वटल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती.
तर या प्रकरणाच्या संदर्भात योग्य ते पुरावे दाखल केले. न्यायालयाने फिर्यादी यांनी दाखल केलेले सर्व पुरावे, फिर्यादी यांच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी बोरुडे यांना न्यायालयाने धनादेश न वटल्याप्रकरणी दोषी ठरवत ४ महिन्यांचा सश्रम कारावास व नुकसान भरपाई म्हणून २ लाख २१ हजार रुपये देण्याची शिक्षा सुनावली आहे.



