पुण्याचे पाणी निवडणुकीत ‘तापणार’; ‘नो वॉटर, नो वोट’चे झळकले बॅनर

पुणे – शहरात उन्हाचा चटका आता चांगलाच जाणवत आहे. सोबतच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून, त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची स्थिती आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी परिसरात यंदा कमी पाऊस झाला. त्यामुळे धरणे जेमतेम भरली. शिवाय, शेतीसाठी आवर्तने सोडणे बंधनकारक असल्याने शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नियोजनाची कसरत सुरू आहे. ‘नो वॉटर, नो वोट’चे असे बॅनर खैरेवाडी परिसरातपरिसरात झळकले आहेत.
यंदा धरणात अडीच-तीन टीएमसी पाणी कमी आहे. अशा स्थितीत शहरातील बहुतांश भागांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर, उपनगरांत मात्र आणखी बिकट स्थिती आहे. समाविष्ट गावांमध्येही बहुतांश सोसायटींची भिस्त टॅंकरवरच असल्याचे चित्र आहे.
तर, दुसऱ्या बाजूला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या खैरेवाडी परिसरातही पाण्यासाठी असंतोषाची स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना साधे पिण्याचे पाणीदेखील वेळेवर आणि पुरेसे मिळत नसल्याने राजकीय नेते आणि प्रचारासाठी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या मतदारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाकीनऊ येत आहेत. तर, समाविष्ट गावांमध्येही अशीच स्थिती असून, निवडणुकीत पाण्याचा मुद्दा तापणार हे निश्चित आहे.





