पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत दोन मेट्रो मार्गांचे काम वेगाने सुरू आहे. तर, “पीएमआरडीए’ आणि मनपा प्रशासनाने यापूर्वीच तिसऱ्या मेट्रो मार्गाला मंजुरी दिली असली, तरी त्या प्रकल्पात अजूनही सुधारणा होत आहेत.
याच शृंखलेत तिसऱ्या मेट्रो मार्गाबाबत आणखी दोन नव्या घडामोडी समोर आल्या आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गासाठी भूसंपादन महापालिका करणार आहे. तर, हा मार्ग हिंजवडी-शिवाजीनगरहून थेट सासवडपर्यंत नेणे शक्य असल्याचा अहवाल दिल्ली मेट्रो प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे पुणेकरांची तिसरी मेट्रो हिंजवडीहून निघून थेट सासवडपर्यंत धावणार आहे.
शहरातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावाला मनपा स्थायी समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी दिली. या मार्गावरील स्थानकांसाठी काही खासगी भूसंपादन करावे लागणार आहे. तो खर्च आता महापालिका करणार आहे. त्यासाठी 7 ते 8 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. रासने म्हणाले, “मनपा हद्दीतील रस्त्याखालील जागा विनामोबदला, विनाअडथळा उपलब्ध दिल्या जातील.
स्टेशनच्या जिन्यासाठी आवश्यक जागा मनपा मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून योग्य त्या मोबदल्यात “पीएमआरडीए’ला मालकी हक्काने हस्तांतरित करण्यात येईल.
तर, या प्रकल्पासाठी मनपा हद्दीतील खासगी जमिनीचे संपादन आवश्यक तेथे “एफएसआय’ किंवा “टीडीआर’ स्वरुपात किंवा पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या खर्चाने करण्यात येणार आहे.’
महापालिका मुख्यसभेची यापूर्वीच मान्यता
शिवाजीनगर ते हिंजवडी या पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेवर काम करण्यासाठी “पीएमआरडीए’ला मनपा मुख्यसभेने यापूर्वीच मान्यता दिली होती. “संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हा मेट्रो मार्ग विकसित करण्यात येणार आहे.