प्रभात वृत्तसेवा सासवड – महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान उमेद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे जिल्हास्तरीय महिला बचत गट खरेदीदार विक्रेता मेळावा पार पडला. मेळाव्यात ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी फार्मदिदी या ब्रँडने खरेदीदार म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालिका शालिनी कडू यांनी केले. मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिला बचत गटांनी त्यांची उत्पादने सादर केली. फार्मदिदीच्या प्रतिनिधींनी उत्पादनांची गुणवत्ता,पॅकेजिंग, सातत्यपूर्ण पुरवठा क्षमता,बाजारपेठेतील संधी यांचा आढावा घेतला. उपक्रमामुळे महिला बचत गटांना नियमित ऑर्डर्स व शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार असल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. फार्मदिदी हा पारंपरिक, नैसर्गिक व घरगुती पद्धतीने तयार अन्नपदार्थांचा ब्रँड असून किमान १० लाख ग्रामीण महिलांना सक्षम बनवणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट असल्याचे फार्मदिदीच्या संचालिका अस्मिता घोडेश्वर यांनी सांगत गेल्या वर्षभरात महिला उद्योजिकांसोबत राबवलेल्या उपक्रमांची व झालेल्या आर्थिक उलाढालीची दखल घेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद, पुणे यांनी फार्मदिदी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल प्रकल्प संचालिका शालिनी कडू यांचे आभार मानले. पुरंदर- दौंडच्या बचत गटांना चालना फार्मदिदीमार्फत पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हवेली, इंदापूर, खेड व दौंड तालुक्यांतील २० बचत गटांना बाजारपेठ मिळत असून वार्षिक ६४ टनांहून अधिक उत्पादन ऑर्डर्स व ९० लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे. Amazon India वर कैरीचे लोणचे Best Seller ठरले असून टॉप १० लोणच्यांमध्ये फार्मदिदीची चार उत्पादने आहेत. स्वतःची वेबसाइट तसेच Amazon, Flipkart, Zepto, Blinkit, BigBasket व Swiggy Instamart या माध्यमातून विक्री होत असून यामुळे ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळत असल्याचे अस्मिता घोडेश्वर यांनी सांगितले त्यांच्या या कार्याचे शालिनी कडू यांनी कौतुक केले.