प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे शहर वाहतूक विभाग हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रीजदरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाकडून नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार कात्रज बायपासवरील भूमकर ब्रीज ते नवले ब्रीज शेवटपर्यंतच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किमी प्रतितास अशी निश्चित करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांतील वाहने जसे की अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी यांना मात्र या आदेशातून सूट देण्यात आली आहे. नवीन वेगमर्यादेची अंमलबजावणी दि. २५ नोव्हेंबरपासून करण्यात येणार असून, पूर्वी जारी करण्यात आलेले सर्व वेगमर्यादेबाबतचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी स्पीडोमीटर तपासून निर्धारित वेगमर्यादेचे पालन करावे, तसेच रस्त्यावरील सर्व मार्गदर्शक फलक व बोर्डिंगकडे लक्ष द्यावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास सीसीटीव्ही व स्पीड गन प्रणालीद्वारे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. नवले ब्रीजजवळ कारचा अपघात नवले ब्रीज परिसरात मध्यरात्री झालेल्या अपघातात एक कार उलटून गंभीर स्वरूपाची हानी झाली. मात्र, वाहनातील दोन्ही प्रवासी सुखरूप होते. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री व्हीआरएल बस स्टॉपजवळ महामार्ग व सर्व्हिस रोडच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर कार जोरात आदळली. धडक एवढी जबरदस्त होती, की कार उलटून सर्व्हिस रोडवर जाऊन पडली. अपघातानंतर वाहनचालक व त्याचा सहकारी हे स्वतः कारमधून बाहेर पडले. दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही.