पुणे -आर्थिक वर्षं संपत आले तरी महापालिकेच्या पाणीपट्टी विभागाकडून केवळ 104 कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे. या विभागास 2022-23 च्या अंदाजपत्रकात सुमारे 506 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, गेल्या वर्षभरात केवळ 20 टक्केच रक्कम या विभागास वसूल करण्यात आली. थकबाकीत महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांचाही समावेश आहे. मात्र, आता ही गावेच महापालिकेत आल्याने तसेच महापालिकेस या गावांना पुरेसे पाणी देता येत नसल्याने गावांमधील नागरिक थकबाकी भरत नसल्याने या विभागाची कोंडी झाली आहे. याशिवाय शहरात रेल्वे, संरक्षण विभाग, कॅंटोन्मेंट, शिक्षण संस्था, शासकीय विद्यापीठ यांना महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. पण त्यांच्याकडूनही दरवर्षी पैसे भरले जात नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठ्याची थकबाकी 619 कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे आयुक्तांकडून या विभागास 526 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, वसुलीसाठी सक्षम यंत्रणा नसणे, शासकीय संस्थाकडून वेळेत बिले न मिळणे, थकबाकी विरोधात न्यायालयात जाणे, महापालिकेकडून चुकीची बिले देणे, तसेच पुरेसे पाणी मिळत नसतानाही मोठ्या प्रमाणात बिल येत असल्याने नागरिक पैसे भरत नसल्याचे चित्र आहे. नळजोड तोडणार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून थकबाकीदारांना नोटीसा बजाविण्यास सरुवात करण्यात आली आहे. तसेच, महापालिकेने वारंवार नोटीसा देऊनही पैसे न भरणाऱ्या संस्था तसेच व्यावसायिक अस्थापनांचे नळजोड तोडण्यात येणार आहेत. शहरात सुमारे 40 हजार मीटरधारक आहेत. तर अनेकांची पाण्याची थकबाकी ही 20 ते 22 वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे नोटीसा देऊनही पैसे न भरणाऱ्यांचे नळजोड तोडण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. लोकअदालतीत बिले महापालिकेकडून पाणीपुरवठयाची बिले पाठविण्यात आल्यानंतरही अनेकजण ती भरत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून अनेकदा लोक अदालतीमध्ये या थकबाकीरांवर दावे दाखल केले जातात. त्यानंतर अनेक जण थकबाकी भरतात. तसेच नियमित भरण्याचे आश्वासनही देतात. मात्र, नंतर पुन्हा थकबाकी ठेवली जाते. त्यामुळे वसूल झालेल्या 104 कोटी रुपयांमध्ये लोकअदालतीमध्येच 30 ते 35 कोटींची वसुली होते. पाणीपुरवठा विभागास पहिल्यांदाच 100 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. थकबाकीदारांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून, 31 मार्चपूर्वी थकबाकी न भरल्यास नळजोड तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. त्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. – अनिरूध्द पावसकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख