पुणे – घराघरांतून दरवर्षी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जाते. त्यासाठी नॉनव्हेज पार्ट्यांचे आयोजन केले जाते. हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंटसह घराघरांतही नॉनव्हेज भोजन केले जाते. यंदा नववर्षाच्या स्वागतानिमित्त पुणेकरांनी तब्बल 2500 बोकड, 600 टन चिकन, 250 ते 300 टन मासळी फस्त केली. नववर्षाच्या स्वागतासाठी मंडळे, संस्था, संघटना, मित्र, नातेवाइक एकत्र येत नॉनव्हेजच्या भोजनाचा बेत आखतात. तसेच हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची संख्या वाढत असते. त्यामुळे चिकन, मटण, अंडी आणि मासळीला प्रचंड मागणी असते. त्यामुळे हॉटेल चालक विक्रेत्यांकडे मटण, चिकन, मासळीची आगाऊ नोंदणी करून ठेवत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. मागील दोन वर्षे करोनाचे सावट होते. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने होती. मात्र यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आल्याने नॉनव्हेजच्या विक्रीत 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती चिकनचे घाऊक व्यापारी रूपेश परदेशी यांनी दिली. दोन दिवस आधीपासून हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह घरगुती ग्राहकांकडून मटणाला मागणी वाढली होती. सुमारे 2500 बोकडांची विक्री झाली. प्रतिकिलोला 700 रुपये दर मिळाला. मागील वर्षीच्या तुलनेत बोकडाची विक्री वाढली आहे. मात्र बोकडाची आवक चांगली असल्याने दरात वाढ झाली नसल्याचे मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. चिकनला मागणी वाढल्याने किलोच्या दरात 20 रुपयांनी वाढ झाली. सुमारे 600 टनांची विक्री झाली. मागील वर्षी 400 ते 450 टनाची विक्री झाली होती. चिकनला प्रतिकिलोला 220 रुपये दर मिळाला. लेगपीस 270, बोनलेस 320, तर जिवंत कोंबडीला 150 रुपये दर मिळाला. मासळीला मोठी मागणी मटण, चिकन आणि मासळीला मागणी वाढली होती. त्यामुळे शनिवारी दिवसभरात शहरात सुमारे 250 ते 300 टन मासळीची विक्री झाली. मागणीच्या तुलनेत मासळीची आवक घटल्याने दरात 10 ते 20 रुपयांची वाढ झाली. मागील वर्षी मार्गशीर्ष महिना होता. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मासळीला मागणी कमी होती. मात्र यंदा मागणी चांगली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशीच रविवार आला असल्याने आजही मासळीला चांगली मागणी असणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी वाढली असल्याचेही परदेशी यांनी सांगितले.