Pune ZP Election 2026 – उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे तीन दिवसांपूर्वी अकस्मात अपघाती निधन झाले. राज्याच्या इतर भागांप्रमाणे पूर्व हवेलीतील नागरिकही हैराण झाले असून काय प्रतिक्रिया व्यक्त करावी, या संभ्रमात नागरिक आहेत. (दि.७) फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या प्रचारावर मोठा परिणाम झाला आहे. पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा मोठा परिणाम निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे सहानुभूतीचा योग्य वापर केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, निणार्यक अवस्थेत हे शक्य होईल का, हा मोठा प्रश्न आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील रणनीतीबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक २ दिवस पुढे ढकलली आहे. आता मतदान (दि.५) फेब्रुवारीऐवजी (दि.७) फेब्रुवारी रोजी होईल. मतमोजणी (दि.९) फेब्रुवारी रोजी केली जाईल. अजित पवार यांच्या निधनामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर प्रचार, सभा, रोड शो न करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ पत्रक वाटपावर भर दिला जाणार आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे आता मतदारांच्यात ‘सहानुभूतीची लाट’ निर्माण होऊन राष्ट्रवादीला त्याचा फायदा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजितदादा पवार निवडणुकीची तारीख दोन दिवस पुढे ढकलली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या आठवणीत आणि सहानुभूतीच्या जोरावर ही निवडणूक लढवताना दिसेल. सहानुभूतीची लाट निर्माण होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व उमेदवारांचा प्रचार सुरु होणारच होता. विमान अपघाताची बातमी आली. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही प्रचार चालूच केला नाही. (दि.३०) जानेवारीपर्यंत शासकीय दुखवटा असल्याने सर्व उमेदवारांनी प्रचार मोहिमा थांबवल्या होत्या. दुपारनंतर उमेदवारांनी हळूहळू प्रचार चालू केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ग्रामीण राजकारणाचा कणा असलेली “मिनी विधानसभा” म्हणजेच जिल्हा परिषद निवडणूक मोठ्या व वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. निवडणुकीत होणारे मतदान आता एका वेगळ्या भावनिक आणि राजकीय वातावरणात पार पडणार आहे.अजित पवार यांचा पूर्व हवेलीत मोठा प्रभाव होता. त्यांच्या आकस्मिक आणि धक्कादायक निधनामुळे मतदारांमध्ये मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना होऊ शकतो. हि भावनिक लाट व सहानुभूती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या बद्दलचा आदर आणि अजित दादांबद्दलची सहानुभूती एकत्र आल्यास विरोधकांसाठी हे मोठे आव्हान ठरेल. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख स्टार प्रचारक होते. पूर्व हवेलीत त्यांच्या २९ व ३० जानेवारी रोजी सभा होणार होत्या. अजित पवार मात्र त्या ऐवजी शोकसभा घेण्याची वेळ आली. विमान अपघातामुळे सर्वच पक्षांचा प्रचार थांबला आहे. प्रत्यक्ष मतदानाला खुप कमी दिवस उरले असताना प्रचाराचा हा वेग मंदावणे उमेदवारांच्या चिंतेत वाढ करणारे आहे.कुठल्याही निवडणुकीत सूक्ष्म नियोजन महत्वाचे असते. पवार यांच्या निधनामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिशा देणारा कर्णधार हरपला आहे. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, इतर सहकारी संस्था, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ यांवर अजित पवार यांची मोठी पकड होती. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये संस्थांची भूमिका कळीची असते. दादांच्या अनुपस्थितीत या संस्थांमधील कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम आता कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपसाठी ही आपली ग्रामीण पाळेमुळे घट्ट करण्याची संधी असली, तरी ते ‘सहानुभूती’च्या लाटेशी कसे झुंजतात, यावरच यशाचा लंबक कुणीकडे झुकणार याचा निर्णय लागेल. अजित पवार यांच्या निधनामुळे मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडून लाडक्या नेत्याला मतांमधून श्रद्धांजली वाहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढू शकते. (दि.७) फेब्रुवारीची ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आता केवळ ‘विकास’ किंवा ‘राजकीय भूमिकां’वर न राहता ती ‘भावनिक’ होणार आहे. निवडणुकीच्या निकालाचे कल अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या लाटेवर अवलंबून असतील. राष्ट्रवादी काँग्रेसला ‘दादां’च्या कामाची शिदोरी, त्यांच्या निधनानंतरची सहानुभूती या जोरावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. ना प्रचार सभा ना रोड शो असा निर्णय घेतला आहे. उमेदवार फक्त परिचय पत्रके वाटून घरोघरी प्रचार करणार आहेत. उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत. निवडून आल्यानंतर देखील कुठलीही मिरवणूक काढली जाणार नाही.