Pune ZP Election 2026 – जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांसाठी उमेदवारांची निश्चिती झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिटची संख्या अंतिम केली आहे. त्यानुसार आता ३ हजार ६९३ मतदान यंत्रे तर ३६०५ कंट्रोल युनिट मतदान केंद्रावर वापरण्यात येणार आहेत. तर १४६ पैकी केवळ तीन गणांमध्ये दोन मतदान यंत्रांची गरज भासणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७३ गटांमध्ये २९९ उमेदवार आता रिंगणात उरले असून, पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत पंचायत समितीसाठी ७२९ तर जिल्हा परिषदेसाठी ४२८ जणांनी माघार घेतल्याने आता मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिटची संख्याही अंतिम करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पुणे महापालिका निवडणुकीत मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिट बंद पडण्याच्या हजारांहून अधिक तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण १४ हजार ३३८ मतदान यंत्रांची उपलब्धता करून दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही उपलब्धता आता दुपटीऐवजी चारपट केली आहे. उमेदवारांची संख्या वाढल्याने बारामती, मुळशी आणि इंदापूर तालुक्यांतील प्रत्येकी एका गणात दोन मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. त्यात मुळशी तालुक्यातील हिंजवडी गटातील माण गण, बारामती तालुक्यातील पणदरे गटातील पणदरे गण इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गटातील सणसर गणाचा समावेश आहे. त्यानुसार मुळशी तालुक्यात २२७ मतदान केंद्रांवर २६२ मतदान यंत्रे बसविली जाणार आहेत. बारामती तालुक्यातील २९९ मतदान केंद्रांवर ३२४ मतदान यंत्रे तर इंदापूर तालुक्यातील ४०० मतदान केंद्रांवर ४२८ मतदान यंत्रे बसविली जाणार आहेत. अन्य तालुक्यांत मतदान केंद्रांच्या संख्येइतकीच मतदान यंत्रे आणि कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.