पुणे जिल्हा परिषद शाळांच बेस्ट

ग्रामीण भागात 1522 विद्यार्थी नव्याने दाखल
37 शाळांमध्ये रांग लावून घेतातहेत प्रवेश
राजगुरूनगर – पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत या शैक्षणिक वर्षात 1522 विद्यार्थी नव्याने दाखल झाले आहेत. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे, अशी माहिती माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत 3621 शाळा आहेत. त्यामधे एकूण 2 लाख 40 हजार 244 विद्यार्थी शिक्षण घेतात. सेमी इंग्रजी, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, दुपारचे जेवण, शालेय साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाते. त्याचबरोबर शिष्यवृती परीक्षा व प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय परीक्षा यामुळे अध्ययन सातत्याने होते. अनेक विद्यार्थी राज्य स्तरावर व जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत चमकतात.
प्रत्येक स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत 75 टक्क्यांपेक्षा पेक्षा अधिक विद्यार्थी हे जिल्हा परिषदेचे असतात. नुसतेच गुणाची परीक्षा न घेता संस्कार व चारित्र्याचे धडे देणारी शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळांकडे पाहिले जाते. जिल्ह्यात 37 शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी रांगा लागतात.
आजही एमपीएससी व युपीएससी परीक्षेत यशस्वी विद्यार्थी संख्येचे प्रमाण हे जिल्हा परिषदेचे आहे. राजकीय , सामाजिक, संशोधन, अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातही जिल्हा परिषदेचे विद्यार्थी अव्वल स्थानावर आहेत. उलट मातृभाषेतून मिळालेले शिक्षण हे आकलनात लवकर येते व दीर्घकाळ स्मरणात रहाते. मुलांना शिक्षक आपले वाटतात ते जीव लावतात म्हणून पालक, समजाला जिल्हा परिषदेच्या शाळा आपली हक्काची शाळा वाटते.
जे आपले पण इंग्रजी शाळेबद्दल विद्यार्थी, पालकांना वाटत नाही ते जिल्हा परिषदेच्या शाळा बद्दल वाटते. क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, योगा, संगणक शिक्षण काही शाळांमध्ये परकीय भाषा कोडींग यांचेही शिक्षण दिले जाते. इंग्रजी माध्यमात फीचा तगदा लावणे, पालकांनी घरी अभ्यास घेण्याची सक्ती करणे, सहशालेय उपक्रमाचे शुल्क सक्तीने आकारणे यामुळे पालकांची मानसिकता बदलली आहे, असे नाईकडे यांनी सांगितले.
इयत्तेनिहाय दाखल विद्यार्थी
पहिली : 750
दुसरी : 340
तीसरी : 287
चौथी : 145
एकूण : 1522
यामुळे पालकांची भूमिका बदलली
या शैक्षणिक वर्षात हे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये शिक्षकांच्या पालक भेटी, जादा तास, लोकसहभाग, गृहभेटी यामुळे पालकांची भूमिका बदलली आहे. शाळांची गुणवत्ता वाढली असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थ शाळेला मदत करू लागले आहेत, अशी माहिती संजय नाईकडे यांनी दिली.





