Pune : तरुणाईच्या ट्रेकवारीने अंधारबन ओसंडले

पुणे – पावसाळी पर्यटनासाठी तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या कुंडलिकेच्या दरीतील अंधारबन ट्रेकसाठी रविवारी तरुणाईची तोबा गर्दी झाली. प्रवेशासाठी पाच हजारांपेक्षा अधिक पर्यटकांनी गर्दी केल्याने वनविभागाने दुपारी प्रवेश देणे बंद केले.
टप्प्याटप्प्याने तीन हजार पर्यटकांना प्रवेश दिल्यावर बाकीच्यांना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश नाकारला. पर्यटकांच्या आषाढवारीने प्रवेशासाठी झालेली कोंडी, ट्रेकमार्गावरील ताण लक्षात घेत वनविभागाने योग्य निर्णय घेतला आणि संभ्याव्य दुर्घटना टाळली.
मे मध्येच पावसाने दमदार हजेरी लावल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच अंधारबनला पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. शनिवार, रविवार ट्रेकसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या रविवारी सकाळी नऊ पासूनच गर्दीला सुरूवात झाली. प्रवेश खिडकीबाहेर अक्षरश: चेंगराचेंगरी होईल अशी स्थिती निर्माण झाली. यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचाही गोंधळ उडाला.
एवढे लोक जर ट्रेकला एकावेळी गेले तर या मार्गावरील पुलावर ताण येईल, नियंत्रण राहणार नाही, त्यामुळे त्यांनी प्रवेश बंद केला. यातच कुंडमळा दुर्घटना नजरेसमोर असल्याने वनविभागाने सावध पवित्रा घेत दुपारी बारा वाजता प्रवेश खिडकी बंद केली. घनदाट जंगलातील धबधबे, झऱ्यांमधून वाट काढत जाणारा अंधारबन हा जंगल ट्रेक गेल्या काही वर्षात समाजमाध्यमांवर प्रचंड लोकप्रिय आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शेकडोंच्या संख्येने तरुण-तरुणी ट्रेकला जातात. यातील काही ट्रेकप्रेमी तर वारीप्रमाणे दरवर्षी हजेरी लावतात. पर्यटकांच्या व्यवस्थापनासाठी वन विभागाने दोन वर्षात अंधारबन ट्रेक मार्गावर मोठे बदल केले असून यात स्थानिकांनाही सहभागी करून घेतले आहे.
रविवारच्या घटनेबाबत अंधारबनचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर भोसले म्हणाले, सकाळी अचानक गर्दी वाढल्याने आम्हाला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दुपारी प्रवेश परवानगीची खिडकी बंद करावी लागली. तीन हजार पर्यटकांना ट्रेकला प्रवेश दिला. उर्वरित लोक परत गेले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
एक जूनपासून आम्ही दुपारी दोननंतर प्रवेश बंद करतो. सकाळीच गर्दी वाढली तर आम्ही लवकरची गेट बंद करतो. संध्याकाळी सहानंतर जंगलात थांबण्यास परवानगी नाही. आमचे गाईड आणि सुरक्षारक्षक सगळे पर्यटक बाहेर पडल्यानंतरच जंगलाबाहेर येतात. ट्रेकचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सुट्टीचे दिवस वगळून आले तर कोणावर परत जाण्याची वेळ येणार नाही.
जंगलाच्या सुरुवातीला प्रवेशद्वार, धोकादायक मार्गावर पूल बांधला आहे. तसेच मार्गावर ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. प्रवेशाच्या आवारातील दर्शनीभागात नियमावली लावली असून उल्लंघन केल्यास होणाऱ्या कारवाईचे फलकही लावले आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली तरी त्यांचे व्यवस्थापन सुरळीत झाल्याची माहिती भोसले यांनी दिली.





