बांधकाम विभागाचे उत्पन्नही 15 कोटी रुपयांनी घटले
पुणे – सन 2018-19 या आर्थिक वर्षांत महापालिकेला सुमारे दीड-पावणेदोन हजार रुपयांची तूट आली असून, बांधकाम, जीएसटी आणि मिळकतकर या प्रमुख विभागाकडून म्हणावी तेवढी वसुली झाली नाही.
बांधकाम परवानगी, मिळकतकर आणि जीएसटी हे महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. मात्र मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही तुटीचेच अंदाजपत्रक असून, उत्पन्नवाढीचा नव्या स्रोतांचा विचार महापालिकेला वेगाने करावा लागणार आहे.
महापालिकेला यावर्षी मिळकतकरातून 1195.75 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच जीएसटीमधून 1,830 कोटी, तर बांधकाम परवानगीमधून 640 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.
मागील वर्षी बांधकाम परवानगीमधून 656 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा ते 15 कोटी रुपयांनी कमी झाले असून, 640 कोटी रुपयेच उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाने 800 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते.
असेच मिळकतकर विभागाचेही आहे. असलेली थकबाकी वसुल करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले होते. मात्र, तेही पूर्ण होऊ शकले नाही. वास्तविक साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची थकबाकी या एका विभागाकडे आहे. अनेक योजना आणून ती वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जीएसटीमधून महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळाले असले, तरी प्रत्यक्षात या तीन विभागांवरच महापालिकेची दारोमदार अवलंबून आहे.
उत्पन्नवाढ स्रोतांची नुसतीच चर्चा
प्रत्येक अंदाजपत्रकात उत्पन्न वाढीसाठी स्रोत वाढवले पाहिजेत अशी चर्चा होते मात्र त्यावर उपाययोजना केली जात नाही. या तुलनेत शहरात मुलभूत सोयी सुविधा पुरवण्याचा खर्च वाढत चालला असून, कर्जरोख्यांचे व्याज भरणे आणि अन्य प्रकल्पांचे कर्ज फेडण्यासाठीही पैसे उभा करणे महापालिकेला आवश्यक आहे. मात्र, त्याचा विचार सन 2019-20 या अंदाजपत्रकातही करण्यात आला आहे.