Pune : येरवडा ते कात्रज रस्ता ; २० कि.मी. बोगदा प्रकल्प

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) येरवडा ते कात्रज या सुमारे २० कि.मी.लांबीच्या बोगदा प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. हा बोगदा शहराच्या दक्षिण ते उत्तर या भागाला जोडणारा असणार आहे. यासाठीचा प्रारूप व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.
तीन कंपन्यांनी या निविदा भरल्या, त्यापैकी एका कंपनीला हे काम देण्यात येणार असून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
मुंबई येथे तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची अर्थसंकल्पाची बैठक झाली होती. त्यामध्ये पीएमआरडीएकडून कात्रज ते येरवडा, असा बोगदा करण्याचा प्रस्ताव मांडला. यावर झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. तसेच, या प्रकल्पाचा आराखडा तयार करावा, हा ट्विन टनेल असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या, त्याबाबतची प्रक्रिया प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे.
कोठून सुरू होणार…
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून हा बोगदा जाणार आहे. यामध्ये दोन्ही बाजूने वाहने ये-जा करणार आहेत. हा बोगदा कुठून सुरू होणार, कुठून बाहेर पडता येणार, या बोगद्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, ही सर्व माहिती डीपीआर तयार झाल्यानंतर समोर येणार आहे. हा बोगदा तयार झाल्यानंतर शहरातील बहुतांशी रस्त्यांवरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे.





