Pune: दिवसा हॉटेलमध्ये काम, रात्री अभ्यास करून मिळवले यश

पुणे – सरस्वती मंदिर संस्थेचे पूना नाइट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा प्रशांतजीत सोनू बेंडल या विद्यार्थ्याने ७८.५० टक्के गुण मिळवून रात्रशाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. दिवसा हॉटेलमध्ये काम आणि रात्रीच्या वेळेस अभ्यास करून त्याने हे यश मिळविले. बँकिंग, फायनान्समध्ये काम करण्याचा त्याचे ध्येय आहे.
प्रशांतजित बेंडल हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचा रहिवासी आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून आईसह लक्ष्मीनगर येथे वास्तव्यास आहे. तर, वडील मुंबई येथे मंडप डेकोरेशनचे काम करतात. सकाळी साडेसात ते सायंंकाळी पाच या वेळेत प्रशांतजीत हा हॉटेलमध्ये काम करतो. त्यानंतर रात्री पूना नाइट हास्कूलमध्ये शिक्षण घेत त्याने बारावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे.
भविष्यात शिक्षण पूर्ण करून बँकिंग, फायनान्समध्ये काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तर, वाहन वितरण (शोरूम) कार्यालयात काम आणि रात्रीच्या वेळेस अभ्यास करून कोमल राजू किरवे या विद्यार्थीनीने रात्रशाळेत व्दितीय क्रमांक पटविला आहे. तिला ७६.६७ टक्के गुण मिळाले आहेत. कोमल वेल्हे तालुक्यातील विंझर या गावाची रहिवासी असून लहानपणापासूनच पुण्यातील कोथरूड येथे वास्तव्यास आहे.
नाइट स्कूलचा निकाल ९७.५० टक्के निकाल
बारावीच्या परीक्षेत सरस्वती मंदिर संस्थेचे पूना नाइट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा ९७.५० टक्के निकाल लागला. परीक्षेला ८० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशांतजीत बेंडल हा विद्यार्थी ७८.५० टक्के गुण मिळवून रात्रशाळेतून प्रथम तर, ७६.६७ टक्के गुण मिळविणारी कोमल राजू किरवे ही विद्यार्थीनी व्दितीय आली आहे. राजेश तानाजी बेंडल या विद्यार्थ्याने ७२.३३ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला आहे.





