Pune : विशेष मुलांसह, रंग बरसे…

पुणे : टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर वंचित आणि विशेष मुलांसाठी रंग बरसे या खास कार्यक्रमाचे आयोजन भोई प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते. विशेष मुलांनी रंगांचा मनमुराद आनंद लुटला. संयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी या कार्यक्रमाचे आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.
रंग बरसे भीगे चुनरवाली.., खंडेरायाच्या लग्नाला.., सैराट.., मै हु डॉन या गाण्यांवर थिरकत रंग आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव, पाण्याचे फवारे यामध्ये विशेष मुलांनी धुलीवंदनानिमित्त रंगोत्सवाचा आनंद लुटला.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, सीबीआयचे उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू पराग काळकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, आमदार हेमंत रासने, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आदींनी सर्व औपचारिकता बाजूला ठेवून या छोट्या बालगोपाळांसमवेत नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला.
भोई प्रतिष्ठानच्या वतीने विशेष मुलांसाठी दरवर्षी रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये विशेष मुले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारी मुले, कातकरी समाजाची मुले, ऊस तोडणी कामगारांची मुले, डोंबारी खेळ करणारी मुले, दिव्यांग मुले, विशेष मुले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले अशी अडीच हजार पेक्षा जास्त चिमुकले सहभागी झाले होते.





