अंतिम निर्णय २० डिसेंबरला; पिंपरीत अनुकूल पुणे : आमचा पक्ष विचारधारेवर चालणारा आहे. राजकरणात संभव-असंभव या गोष्टी असतातच. पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काॅग्रेस सोबत जाणार की नाही याचा निर्णय २० डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जाहीर करतील अशी माहिती राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दुसरीकडे याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच प्रफुल्ल पटेल यांची लवकरच बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे, हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये भाजप-राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादी ताकदीने लढेल असे स्पष्ट केले. त्यानंतर मंगळवारी दिवसभर अजित पवार यांनी पुण्यात बैठकां घेतल्या. यात पिंपरी-चिंचवड मधील पक्षाचा प्रभागनिहाय आढावा घेतला. त्यानंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर उद्या ( बुधवारी) राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या विषयावर चर्चा करणार आहेत. एकत्र येण्यास विरोध करणाऱ्या प्रशांत जगताप यांनी आता ही बाब वरिष्ठ नेत्यांवर सोपवली आहे.२० डिसेंबर रोजी पुण्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पक्षाचे पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष तसेच आजी, माजी आमदारांची बैठक घेऊन चर्चा करतील. त्यानंतर ते पक्षाची भूमिका स्पष्ट करतील असे जगताप यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्यास तयार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. याबाबत स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात बैठका झाल्या असून तशी भूमिका अजित पवार यांच्यासमोर पुण्यात मांडण्यात आली असल्याची चर्चा आहे. भाजपला रोखण्य़ासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यास सहमती दर्शवल्याचे समजते.