पुणे – कष्टकऱ्यांची घरे असलेल्या प्लॉट वसाहतीतील शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता हे येथील प्रमुख प्रश्न असून, आगामी काळात त्यांना प्राधान्याने सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे आश्वासन प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी – डायस प्लॉट) परिसरात काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे यांनी दिले. त्यांनी या प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ डायस प्लॉट वसाहतीमधील घरांना भेटी दिल्या. रफिक शेख, दिलशाद शेख यांच्यासह विठ्ठल थोरात, यासर बागवे, दयानंद अडागळे, शिलार रत्नागिरी, धरम कांबळे, महेबूब नदाफ, युनूस शेख, शिवाजी भोसले, बाबा सरोदे, सुभाष दुबळे, सचिन घोलप यांच्यासह डायस प्लॉट वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी डायस प्लॉट वसाहतीतील प्रत्येक घराला भेट देत नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. डायस प्लॉट ही अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेली वसाहत असून, येथील नागरिकांना मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन या वेळी बागवे यांनी केले.