पुणे: उच्च शिक्षण रुळावर येणार का?

नियोजन सुरू:पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष यंदा 1 जुलै ते 15 मे 2023
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांचे 2022-23 हे शैक्षणिक वर्ष एक जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानुसार प्रथम वर्ष वगळता सर्व पदवी आणि पदव्युतत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष एक जुलैपासून सुरू होतील. तर 15 मे 2023 ला शैक्षणिक वर्ष संपणार आहे. हे वेळापत्रक केवळ विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागांसाठी लागू राहणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने संकुलातील विभागांचे शैक्षणिक वर्षाबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यापीठाने विस्कटलेले शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार प्रथम सत्रांचे शैक्षणिक वर्ग एक जुलैला सुरू होणार असून, 10 डिसेंबरला प्रथम सत्र संपणार आहे. दुसऱ्या सत्राला दि. 2 जानेवारी 2023 रोजी सुरुवात होईल, तर 15 मे 2023 रोजी दुसरे सत्र संपणार आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्य विद्याशाखा, आंतरविद्याशाखा, वाणिज्य आणि व्यवस्थापन अशा चार विद्याशाखांमधील अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक लागू राहणार आहे. प्रथम वर्षाचे प्रवेश होण्याला थोडा अवधी असल्याने, प्रथम वर्ष अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर शैक्षणिक वर्षासाठी वेळापत्रक जाहीर होणार आहे, अशी माहिती परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
महाविद्यालये सुरू होण्यास विलंब
विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांच्या सत्र परीक्षा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे या महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर होण्यास काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.




