पुणे – महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या दरवाढीमुळे महावितरण कंपनीला आगामी दोन वर्षात अतिरिक्त महसूल 39 हजार 567 कोटी रुपये मिळणार आहे. याचा अर्थ वाढीव वसूल केली जाणारी रक्कम म्हणजेच दरवाढ 21.65 टक्के आहे. पहिल्या वर्षीची वाढ 7.25 टक्के व दुसऱ्या वर्षी एकत्रित एकूण वाढ 14.75 टक्के आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या दरवाढीच्या विरोधात विद्युत अपिलीय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे अपील दाखल करणार असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.
प्रत्यक्षात वीज आकारातील वाढीची तपासणी केली तर ती वाढ 10 ते 52 टक्के इतकी आहे. स्थिर आकारातील वाढीची तपासणी केली, तर ती वाढ पहिल्या वर्षी 10 टक्के व दुसऱ्या वर्षी एकूण 20 टक्के याप्रमाणे आहे. आयोगाचा हा आदेश सर्वसामान्य वीज ग्राहकांना फसवणारा, त्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारा व त्यांच्यावर प्रचंड दर वाढीचा बोजा लादणारा आहे. त्याचबरोबर दिलेली वाढ ही अत्यंत बेकायदेशीर मार्गाने व चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेली आहे, असे होगाडे यांनी सांगितले.