प्रकाश बिराजदार विश्रांतवाडी – वडगावशेरी मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस बदलत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून लढविण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच तुतारीचा प्रचार सुरू केला आहे. त्यातच, सोमवारी (दि.९) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांची त्यांच्या धानोरीतील निवासस्थानी भेट घेतल्याने टिंगरे हे देखील तुतारीकडून उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली आहे. यामुळेच तुतारीचा उमेदवार नक्की कोण? याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. वडगावशेरीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा त्यांच्याकडेच कायम राहील. यामुळे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक, बापूसाहेब पठारे व माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांच्यासह महायुतीमधील इच्छुक नेत्यांची घुसमट वाढली आहे. याची प्रचिती नुकत्याच झालेल्या भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात दिसून आली. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचे काम करणार नसल्याचे लेखी पत्र पक्ष निरीक्षक आमदार पंकजा मुंडे यांना मतदारसंघाच्या अध्यक्षांनी दिले. याच मेळाव्यात भाजपचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांनीही आमदार टिंगरे हे युतीधर्म पाळत नसल्याची नाराजी जाहीर भाषणात व्यक्त केली. याच कारणातून अनेक जण अन्य पक्षांची चाचपणी करू लागले आहेत. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी तुतारीकडून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ते तुतारीकडून उमेदवार असतील, अशी चर्चा मतदारसंघात रंगत असताना सोमवारी (दि.९) जयंत पाटील यांनी रात्री उशीरा अनिल टिंगरे यांची भेट घेतली. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय गणिते पुन्हा फिरली आहेत. पठारे यांना अद्याप प्रवेश दिला नाही… माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी तुतारीचा प्रचार सुरू केल्याबाबत पत्रकारांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता, पठारे यांना अद्याप पक्षात प्रवेश दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याच रात्री भाजपचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या मंडळांना भेटी देत निवासस्थानी जमलेल्या कार्यकर्त्यांची पाटील यांनी भेट घेतली. मागील पंधरा दिवसापूर्वी पठारे यांच्या निवासस्थानीही जयंत पाटील यांनी भेट दिली होती. त्यामुळे पठारे, टिंगरे की अन्य कोण तुतारी वाजवणार? अशी चर्चा मतदारांमध्ये आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीमध्ये होतो. तसेच, पहिल्यांदा त्याच पक्षाकडून नगरसेवक होण्याची संधी मला मिळाली. पूर्वीपासून माझे आणि जयंत पाटील यांच्या संबंध आहेत. गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी माझ्या प्रभागात येणार असल्याने त्यांना घरी येण्याची विनंती केल्याने ते घरी आले होते. ही राजकीय भेट नव्हती. सध्या मी भाजपमध्येच आहे.” – अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे, माजी नगरसेवक, भाजप.