पुणे – ‘त्या’ क्‍लासचालकांवर कारवाईची जबाबदारी कोणाची?

असुरक्षित कोचिंग क्‍लासेस : विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्‍यात

पुणे – शहराच्या मुख्य व उपनगर भागातील खासगी क्‍लासचालक शालेय विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क वसूली करतात. मात्र आगीसह इतर घटनांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी क्‍लासचालकांकडून कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नाहीत. या क्‍लासचालकांवर कारवाई कधी होणार व कोण करणार? असा प्रश्‍न सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

सुरतमधील कोचिंग क्‍लासेसच्या आग दुर्घटनेनंतर सर्वच खासगी क्‍लासचालकांचे धाबे दणाणले आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी क्‍लासचालकांनी मोठ्या प्रमाणात गल्ली-बोळांत दुकानेच मांडली आहेत. बहुसंख्य क्‍लास हे अनधिकृतपणेच सुुरू असून यावर शिक्षण विभाग अथवा इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रणच राहिलेले नाही. जास्तीत जास्त विद्यार्थी आकर्षित व्हावेत, यासाठी क्‍लासचालकांकडून जोरदार मार्केटिंगही सुरूच असते. शाळांमध्ये शिकविणारे शिक्षकच बरेचशे क्‍लासेच चालवित असतात. याबरोबरच पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महिला व पुरुष नोकरी करण्याऐवजी क्‍लास चालविणाऱ्या प्राधान्य देत असलेल्या चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळते.

प्रशासन कारवाईचे धाडस करणार का?
अनधिकृतपणे क्‍लास चालविणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण विभागाने कठोर कारवाई करण्याच्या केवळ घोषणा करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. रहिवासी इमारतीत क्‍लास चालवून त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याने महापालिकेकडून संबंधित प्लॅट अथवा घर मालकांवर कारवाई करण्याचे धाडस दाखविलेच पाहिजे.

जागा मिळेल तेथे “दुकान’
व्यावसायिक जागेऐवजी रहिवाशी इमारतीच हे क्‍लासेस सुरु असतात. बैठी घरे, प्लॅट, पार्कींग, टेरेस या ठिकाणीच क्‍लास चालू असल्याचे आढळून येते. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काहीच सुविधा उपलब्ध नसतात. शॉर्टसर्किटसह इतर कोणत्याही कारणाने आगी लागण्याच्या घटना शहरात घडत असतात. त्यातून आता क्‍लासचीही सुटका झालेली नाही हे सुरतच्या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.

पालक म्हणतात…
शालेय विद्यार्थ्यांसाठी खासगी क्‍लासचालकांकडून मोठ्या प्रमाणात फी आकारली जाते. क्‍लाचचालकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणेसह इतर महत्वपूर्ण उपाययोजना राबविण्यासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे. आगीसह इतर कोणत्याही दुर्देवी घटना घडूच नयेत याची आधीच खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.