Pune: महाविकास आघाडीत ‘पर्वती’ कोणाकडे?

पुणे – पर्वती मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या आमदार माधुरी मिसाळ यांना भाजपने पुन्हा एकदा विधानसभेची संधी दिली आहे. परंतु महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मूळ मतदारसंघ असलेल्या पर्वतीवर काॅंग्रेस पक्षानेही दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून कोणत्या पक्षातून कोण उमेदवार उभे राहणार आहे, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.
पर्वती मतदारसंघातून यंदाही स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारची मागणी केली आहे. त्यादृष्टीने त्यांनी मतदारसंघात मोर्चबांधणी सुरू केली आहे. वेगवेगळ्या उपक्रमातून त्या मतदारांशी संपर्कात आहे. त्यांनाच उमेदवारी मिळावी, अशी पक्ष कार्यकत्यांची मागणी आहे.
मात्र, महाविकास आघाडीत काँग्रेसकडून आबा बागूल हे सुद्धा उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना – ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळावी, अशी सचिन तावरे यांची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जयराज लांडगे हे यावर्षी इच्छुक आहेत. पर्वती मतदारसंघ भाजपवगळता अन्यत्र जागावाटपावरुन अद्याप स्पष्टता नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
२०१९ मध्ये कशी होती स्थिती
पर्वती मतदारसंघात सन २०१९ मध्ये भाजपच्या अनुभवी आमदार माधुरी मिसाळ आणि तत्कालीन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाकडून अश्विनी कदम यांच्यात मुख्य लढत झाली. यात मिसाळ यांना 90 हजार 461, तर आश्विनी कदम ६० हजार २४५ मते मिळाली. या निवडणुकीतही दोन्ही महिलांमध्ये चुरशीची निवडणूक होणार असल्याची चर्चा होती. मात्र, अजूनही महाविकास आघाडीतून उमेदवाराविषयी संदिग्धता दूर झालेली नाही.
भाजपमधील बंड थंडावले?
यंदा पर्वती मतदारसंघातून भाजपमधून माधुरी मिसाळ यांच्यासह महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनीही तिकीटासाठी थंड थोपटले होते. त्यातच श्रीनाथ भिमाले हेदेखील येथून उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना महामंडळाचे अध्यक्षपद देऊन नाराजीचा दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भिमालेंसह अन्य इच्छुकांकडून बंडखोरी मावळल्याची चिन्हे आहेत.





