पुणे – रस्ते तुंबणे, खड्ड्यांबाबत ‘व्हॉट्‌स ऍप’ तोडगा

समन्वय साधण्यासाठी पोलीस-महापालिका अधिकाऱ्यांचा ग्रुप : तातडीने होणार कार्यवाही

पुणे – पोलीस आणि महापालिकेतील अधिकारी यांचा “ट्रॅफिक कोऑर्डिनेशन’ नावाने “व्हॉट्‌स ऍप’ ग्रुप बनवण्यात आला असून, त्या आधारे समन्वय चांगल्याप्रकारे साधला जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

रस्त्यांवर पडलेले खड्डे, पाणी तुंबणे, ट्रॅफिक सिग्नल आणि अन्य समन्वयाच्या महापालिकेशी संबंधित विषयांची माहिती या ग्रुपवर शेअर केली जाते. त्याप्रमाणे त्या समस्यांचे निराकरण संबंधित विभागातर्फे करण्यात येते.

या सगळ्या अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त बैठक घेणार असून, त्यांच्याही सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. या आधीही पोलीस आयुक्तांबरोबर दोन बैठका झाल्याची माहिती, महापालिकेतील पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. पावसाळ्यात रस्त्यांमध्ये पाणी तुंबण्याचा प्रकार मोठ्याप्रमाणात होतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अशावेळी वाहतूक पोलीसांची तारांबळ उडते. संपूर्ण शहरात हीच स्थिती असते.

महापालिकेची यंत्रणा पावसाळ्यात कार्यरत असतेच. परंतु प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस त्याचा सामना करत असतो. त्यामुळे या परिस्थितीची माहिती त्यांनी या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर टाकली तर लगेचच, त्याठिकाणी “क्विक रिस्पॉन्स’ टीम पोहोचून त्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे. या विषयांत वाहतूक पोलिसांशी, त्यांच्या कंट्रोल विभागाशी चांगला समन्वय ठेवण्याचा प्रयत्न यावर्षीही केला जाणार आहे, असे प्रशासनासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनो, खड्डा दिसताच लावा फोन
महापालिकेने 24 तास हेल्पालाइन व्यवस्थाही केली आहे. पावसाळ्यात रस्ते, खड्डे या संदर्भात महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी 020-2551083 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

केवळ पावसाळ्यापुरतेच नव्हे, तर अन्यवेळीही पोलीसांच्या समन्वयाची गरज असते. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा होतो. तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक वळवावी लागते. तसेच पाइपलाइन, ड्रेनेजलाइन या कामांमध्येही वाहतूक पोलीसांशी समन्वय साधावा लागतो. त्यासाठीही हा “व्हॉट्‌स ऍप’ ग्रुप अत्यंत उपयोगी आहे.
– अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, मनपा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.