आंबेगाव बुद्रुक -कात्रज चौकासह आंबेगाव परिसर, नवले पूल, दत्तनगर, वंडर सिटी परिसर, भूमकर चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी दुपारी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्यामुळे तसेच पुण्यात रहिवासी असलेले मात्र नोकरीसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर येथील कर्मचारी पुणे शहराकडे मोठ्या प्रमाणात आल्याने त्या वाहतुकीचा ताण नवीन कात्रज चौकासह आंबेगाव परिसरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर पडला.
या भागात शनिवार-रविवार अशा वीकेंडच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. पुणे महापालिका वाहतूक विभा व पोलीस विभाग यांचे कर्मचारी अपुरे पडत असल्याने वाहतूक नियमांचे तीन-तेरा वाजतात, याचा अनुभव आज आला. त्यामुळे वीकेंडच्या दिवशी तरी महापालिका व वाहतूक पोलीस विभाग यांनी एकत्र नियोजन करून कात्रज तसेच आंबेगाव परिसरातील वाहतुकीचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. कात्रज, आंबेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांतील नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त राहण्यास आहेत. तसेच, या भागात भारती विद्यापीठमुळे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. याच कारणातून शनिवार तसेच रविवार या वीकेंडच्या दिवशी प्रवासी वाहतुकीमुळे मोठी गर्दी होत असते. याचे ठोस नियोजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.