प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या २४ तासांत थंडीचा पार दोन ते तीन अंशाने वाढल्यामुळे शहरातील थंडीचा जोर ओसरला आहे. किमान आणि कमाल तापमानातही वाढ झाल्यामुळे शनिवारी (दि. २२) शहराच्या बहुतांश भागात दुपारी हवामान कोरडे होते. तसेच उन्हाचा चटका जाणवत होता. पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल तर आकाश निरभ्र राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. हंगामातील निचांकी तापमान ६ अंशापर्यंत खाली गेल्याने कडाक्याच्या थंडीला सुरवात झाल्याचे वाटले. मात्र, ४८ तासात किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली. मागील चार दिवसांत पाच ते सहा अंशाने किमान तापमान वाढल्यामुळे ६ ते ७ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान सध्या १२ अंशाच्या पुढे नोंदविले गेले. हवेली, माळीण परिसरासह शिवाजीनगर, पाषाण परिसरातील पारा १४ अंशावर पोहचला. त्यामुळे पहाटे आणि रात्रीसह दिवसभर जाणवणारी थंडी गायब झाली. समुद्रावर तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राने थंडी कमी झाली आहे.आठवडाभर तरी शहरात थंडीचा जोर कमीच राहील, असे दिसते. मध्य महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे शहरात दुपारनंतर अधून-मधून ढगाळ वातावरण राहील. सध्या तरी शहरात अवकाळी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली नसून, दिवसभर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर थंडीचा जोर नसला तरी पहाटे धुके आणि हलकीशी थंडी असेल. नोव्हेंबरनंतर थंडीचा जोर डिसेंबरमध्ये वाढणार का? अवकाळी पाऊस थंडीवर परिणाम करणार का, हे हवामान बदलावरून स्पष्ट होईल. किमान तापमान पाषाण १३.८, शिवाजीनगर १४.४, कोरेगांव पार्क १७.५, चिंचवड १७.९, वडगांवशेरी, हवेली १२.२, माळीण १३.५, तळेगांव दाभाडे १४.३, १८.७ दौंड, आंबेगांव १४.६, बारामती १४.८, शिरूर १५.५, गिरीवन १६.७