Pune Weather – शहरासह जिल्ह्यात गेले तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात काही अंशी घट झाली असली दुपारचा उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. रात्री व पहाटे हवेतील गारवा या उकाड्यावर काहीशा दिलासा देत आहे. शनिवारी (दि. २) बारामती येथे सर्वाधिक ४०.१ तर शहरातील लोहगाव येथे ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मागील आठवड्यात उन्हाच्या पाऱ्याने उच्चांक गाठत तब्बल ४३ अंशापर्यंत मजल मारली. त्यामुळे पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. नागरिक उकाड्याने घामाघुम झाले. या दिवसात उष्माघाताच्या रूग्णांची संख्याही वाढल्याचे दिसून आले. मात्र, मागील ७२ तासांत शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली. परिणामी ४३ अंशावर पोहचले कमाल तापमान शनिवारी ३९. ७ अंशापर्यंत खाली आले. लोहगाव पाठोपाठ शिवाजीनगर, मगरपट्टा, हडपसर, एनडीए या परिसरासह जिल्ह्यातही कमाल तापमानात घट झाली. त्यामुळे दुपारनंतर जाणवणारा उन्हाचा चटका काहीशा कमी झाला. शहरासह उपनगरात रात्री हवेत गारवा असल्यामुळे उकाडाही कमी झाला असून, पहाटे गारवा जाणवत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरातील आकाश निरभ्र राहील, कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. शनिवारचे तापमान बारामती ४०.१, लोहगाव ३९.७, दौंड ३७.९, मगरपट्टा ३७.७, शिवाजीनगर ३७, कोरेगाव पार्क ३६.८, एनडीए ३६.४, पाषाण ३६.३, चिंचवड ३६.१, वडगावशेरी आणि हडपसर ३५.७, बालेवाडी ३४.५ अंश सेल्सिअस.