Pune Weather – जिल्ह्यातील काही परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहर आणि उपनगरांत ढगाळ वातावरण झाले. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. परिणामी गुरुवारी (दि. २३) दिवसभरात कमाल तापमानात एक ते दीड अंशाने वाढ झाली असून, लोहगाव येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कोरेगाव पार्क ४०.९, शिवाजीनगर ४०.२, बारामती ३९.६ आणि हडपसर येथे ३९ सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले. शहरातील उपनगरांत कोथरूड, पाषाण, बावधन, सुस, औंध, वारजे, धायरी, खडकवासला, कात्रज यांसह अन्य परिसरात काल सायंकाळी गारांचा पाऊस झाला. परिणामी हवेत गारवा पसराला. मात्र, आज सकाळपासून शहरातील उन्हाचा चटका वाढल्याने पुणेकर घामाघूम झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास उपनगरांतील काही भागात आकाशात काळे ढग भरून आले. मात्र, पावसाने हुलकावणी दिली आणि उकाडा आणखी वाढला. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.