Pune Weather – आठड्यापासून सुरू असलेल्या ऊन-सावल्यांच्या खेळात आता अवकाळी पावसानेही हजेरी लावली आहे. या लपंडावामुळे शहर आणि जिल्हाभरातील हवामानात बदल होत आहे. गेल्या २४ तासात कमाल तापमानात चार ते पाच अंशाने घट झाली. बुधवारी (दि. २०) पारा ३८ अंशापर्यंत खाली आल्याने उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांत उष्णतेचा पारा ४२ अंशापर्यंत पोहचल्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत होते. बुधवारी सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली. दुपारपर्यंत ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. तापमान घटले तरी हवेतील आर्द्रतेमुळे दुपारी नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवत होता. घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले. दुपारनंतर हवामानात अचानक बदल झाला आणि शहराच्या विविध उपनगरात तुरळक ठिकाणी तर जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे संध्याकाळनंतर वातावरणात बदल झाला. दुपारपर्यंत जाणवणारा उकाडा गायब होऊन रात्री चांगलाच गारवा निर्माण झाला. पुढील दोन दिवसात जिल्ह्यातील वातावरण निरभ्र तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारचे तापमान लोहगाव ३८.४, शिवाजीनगर ३६.३, पाषाण ३६.१, चिंचवड ३५.१, हडपसर ३४.८, बालेवाडी ३३.१, माळीण ३१.८, आंबेगाव ३६.५, बारामती ३५.९, शिरूर ३४.४,हवेली ३४.५, एनडीए आणि दौंड ३५.४ अंश सेल्सिअस.