Pune : आम्ही फक्त राजकीयदृष्ट्या भाजपसोबत

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सन २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक वर्षे भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात तळ्यात-मळ्यात भूमिका होती. अखेर मी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीयदृष्ट्या भाजपसोबत आहोत. आम्ही भाजपसोबत लग्न केलेले नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे मांडली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये “संसद कट्टा’अंतर्गत विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार संजय आवटे यांनी भुजबळ यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या राजकारणाचा पट विद्यार्थ्यांसमोर उलगडला. इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेत्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. मी शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी मुख्यमंत्री झालो असतो. तसेच काँग्रेसमध्ये राहून काम केले असते आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळीही मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती. परंतु ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडून दिल्या. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही, तर ओबीसींचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मी आजही पद नसताना लढत राहणार आहे, असेही भुजबळ म्हणाले.
…मानसन्मान मिळावा
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असणारा मी ज्येष्ठ नेता आहे. तरीही अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आज मला आज मंत्रिपद का मिळाले नाही ? मला मिळणारे पद महत्त्वाचे नाही, परंतु मानसन्मान जर मिळाला नाही तर माणूस दुःखी होतो, अशी खंतही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.




