Pune : सिंहगड रोडवर जलवाहिनी पुन्हा फुटली काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

पुणे : सिंहगड रोडवरील राष्ट्रसेवा दल शाळेसमोरील जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून, शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. रविवारी (दि. २३) पहाटे पावणेदोनच्या सुमारास ही लाईन फुटल्यानंतर पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तात्काळ दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, दिवसभर काम सुरू असल्यामुळे शहराच्या मुख्य भागातील सदाशिव पेठेसह काही पेठा आणि शिवाजीनगर परिसर व अन्य परिसरात पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांची सुट्टी पाण्याच्या प्रतिक्षेतच गेली.
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाने युध्द पातळीवर काम करून पाणीपुरवठा सुरळीत केला. मात्र, रविवारी (दि. २३) पहाटे दोनच्या सुमारास तीच जलवाहिनी पुन्हा फुटल्यामुळे सगळ्यांची धावपळ सुरू झाली. पाणीपुरवठा बंद करून सकाळी दुरूस्तीच्या कामाला सुरवात झाली. मात्र, त्यामध्ये हजारो लिटर पाणी वाया गेले. ही जलवाहिनी पूर्वी मुख्य असल्यामुळे शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, काही महिन्यांपूर्वीच पाणीपुरवठा विभागाने दुसरी मुख्य जलवाहिनी टाकल्यामुळे पाण्याचे विभाजन झाले. मात्र, वारंवार त्याचठिकाणी जलवाहिनी फुटत असून, नक्की कशामुळे जलवाहिनी फुटली याची पाहणी सुरू आहे.
आज रविवार सुट्टीचा दिवस, त्यात सकाळी नेहमीप्रमाणी पाणी आलेच नाही. त्यामुळे सकाळपासून सदाशिव पेठ आणि शिवाजीनगर परिसरातील नागरिक पाण्याच्या प्रतिक्षेत बसले. मात्र, पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याचे समजल्यावर दुपारपर्यंत तरी पाणी येईल या आशेवर नागरिक बसले. मात्र, सायंकाळ झाली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तरी पाणीपुरवठा सुरू झालेला नव्हता, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
रात्री पावणेदोनच्या सुमारास ही जलावाहिनी फुटली. त्यामुळे सदाशिव पेठ, शिवाजीनगर परिसरातील पाणीपुरवठा बंद झाला. जलवाहिनीचे काम युध्द पातळीवर सुरू असून, रात्री नऊपर्यंत काम पूर्ण होईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.
– नंदकिशोर जगताप – मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग





