प्रशासकीय खात्यांचे दुर्लक्षच ; वाढती अतिक्रमणे, अपूर्ण कामे महर्षीनगर – मुकुंद नगर-सैलसबरी पार्क प्रभाग क्र. २१ मध्ये स्वारगेट एसटी बस स्टँड या परिसराचा समावेश होतो, वाहतुकीच्या निमित्ताने दररोज हजारो नागरिक येथून प्रवास करतात, त्यामुळे पुणे शहरातील या प्रभागाचे विशेष महत्त्व आहे. स्वारगेट, महर्षी नगर, मुकुंद नगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी, आंबेडकर नगर, मार्केट यार्ड, सॅलसबरी पार्क, औद्योगिक वसाहत, ज्योती हॉटेल भाग कोंढवा, फकरी हिल, पारसी हिल, प्रेमनगर वसाहत, भुर्हानी कॉलनी, हमाल नगर, आदिनाथ सोसायटी अशा महत्वाच्या भागांचा मिळून हा प्रभाग क्र. २१ तयार झाला आहे. या भागात गेल्या काही वर्षांतील विकासकामांचा आलेख पाहता, प्रशासकीय कामांबाबत बोंबच म्हणावी लागेल, काही उच्चभ्रू परिसर वगळता म्हाडा वसाहत आणि झोपडपट्टी येथे मोठ्या प्रमाणात झालेली अनधिकृत बांधकामे, यातून वाढलेल्या नागरी समस्या असेच चित्र पहायला मिळते. या भागातील वाहतूक कोंडीची समस्याही नेहमीच चर्चेची राहिली आहे. या परिसरात पार्किंगची मोठी अडचण आहे. यामुळे जागा मिळेल तेथे वाहने उभी केलेली दिसतात. रस्त्याकडेला अशी वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अरूंद होऊन वाहतूक कोंडीची समस्याही वाढली आहे. मार्केट यार्ड मधील भुसार बाजार आणि भाजी, फुल बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. पदपथावर अनधिकृत अतिक्रमणे आणि बेकायदेशीर ताबे यामुळे पदपथ नावालाच शिल्लक राहिला आहे. महर्षी नगर मध्ये म्हाडाच्या वसाहतीमध्ये अनधिकृत बांधकामे वाढत असताना यावर कोणत्याच प्रशासकीय खात्याचा वचक राहिलेला नाही. राजकीय फायद्यासाठी बकालपणा वाढण्यास वाव दिला जात असल्याने याचा ताण अधिकृत सोसायट्यांवर येत असून मूलभूत समस्या परिसरात वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापालिका निवडणूक झालेली नाही, त्यामुळे विकासकामांवरही मर्यादा आल्या आहेत. यातून माजी नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील वाढत्या समस्यांच्या कारणास्तव नागरिक प्रशासनावर थेट नाराजी व्यक्त करीत आहे. अनेक मोठ्या योजना फक्त कागदोपत्री संथगतीने सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांत उच्चभ्रू भागात चमकोगिरीची कामे करून लाखो रुपयांचा निधी वाया गेला, असल्याचेही नागरिक स्पष्ट सांगतात. अशी आहे राजकीय स्थिती महर्षीनगर परिसर कधी काळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या भागात गेल्या काही वर्षांपासून भाजप पक्षाची तुल्यबळ वाटू लागला आहे. याच कारणातून भाजप मधून इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामुळे या प्रभागातून भाजप युवकांना संधी देते की जुन्या जाणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळते, याकडे विरोधांचे लक्ष असणार आहे. या प्रभागात जैन मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे जैन उमेदवाराला संधी देण्याबाबतही प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी प्रयत्नशील असतील, अशीही चर्चा आहे. स्थानिक पातळीवर पक्षा पेक्षा ही उमेदवाराचा चेहरा व कामे पाहून मतदान होते. मात्र, या प्रभागात मोठी मतदार संख्या असल्याने चारच्या प्रभागाचे गणित कोणाच्या पथ्यावर पडेल, याबाबत तर्क लावले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांत मोठे नागरिकांच्या हिताचे प्रकल्प राबविण्यात व शाश्वत विकास करण्यात राजकीय पक्ष अयशस्वी ठरले आहेत, हे मान्य करावे लागेल. हे आहेत इच्छुक उमेदवार काँग्रेस पक्ष : भरत सुराणा, सीमा महाडिक, योगिता सुराणा, सुरेश चौधरी, स्नेहल पाडळे, कृष्णा सोनकांबळे, अकबर मणियार, पुष्कर आबनावे, अनुसया गायकवाड, देविदास लोणकर. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : संतोष नांगरे, शोभा नांगरे, श्वेता होनराव, राहुल गुंड, सीमा गुंड, योगेश रणदिवे, करण गायकवाड, दिनेश खराडे, सुरज लगाडे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) : बाळासाहेब अटल, कुणाल गायकवाड, रेणुका गायकवाड, संजय दामोदरे, लखन वाघमारे, रोहिदास खुडे, मृणालिनी वाणी, अश्विनी राऊत, प्रियांका पवार, मोहसिन काझी, सचिन निगडे. प्रचारात हे मुद्दे राहणार चर्चेत – वाढलेली वाहतूक कोंडी, – कचरा, ड्रेनिजचे व्यवस्थापन नाही – अनधिकृत बांधकामे, – सर्वच रस्ते खड्डेमय – वाढती गुन्हेगारी पुजारी गार्डन मध्ये विकास कामे केली, मनपा शाळेत विशेष कामे केली, स्वारगेट बस स्टँड, वस्ती विभाग, सोसायट्या येथे रस्ता, पाणी व ड्रेनेजची विशेष कामे केली. आरोग्य बाबत उपक्रम राबवले अनेक नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत. यापुढेही प्रभागात विकासाचे व्हिजन ठेऊन वाहतूक कोंडी सारख्या समस्या सोडविणे बाबत प्रयत्न करणार आहे. – प्रविण चोरबेले, माजी नगरसेवक प्रभागात अभ्यासिका , पॅथॉलॉजी लॅब अशी विकासकामे केली आहेत. महिला सक्षमीकरण उपक्रम राबविले करोना काळात कामे केली, भविष्यात नवीन क्रीडा संकुल उभारणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉल बांधणे, अल्प दरात सोनोग्राफी मशीन या सारख्या आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आहे. – राजश्री शिळीमकर, माजी नगरसेविका …………………………………… कोट – रस्ते, पाणी, शाळा, उद्याने अशी अनेक विकासकामे प्रभागात केली गेली अनेक वर्षे कामे करताना नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. यापुढेही या भागात लोकाभिमुख कामे करणार आहे. – कविता वैरागे, माजी नगरसेविका …………………………………… कोट – प्रभागात नवीन उड्डाणपूल उभारण्यात यश मिळाले त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली. भव्य उद्यान उभे केले, मोठ्या पाण्याच्या टाक्यांचे काम केले, नागरिकांना अल्प दरात आरोग्य तपासणी उपक्रम सुरू होणार आहे. गंगाधाम चौकात नवीन उड्डाण पुल उभारणार आहे, वस्ती भागात पाणी व ड्रेनेजची अजून चांगली सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार – श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक