पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर प्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या अंतर्गत विद्यापीठाच्या अधिसभेवर अध्यापक प्रतिनिधी म्हणून निवडून देण्यासाठी तसेच अभ्यास मंडळ व विद्या परिषदेवर प्रतिनिधी निवडून देण्यासाठी 8 जानेवारी 2023 रोजी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. विद्यापीठाकडून काही दिवसांपूर्वी पदवीधर मतदारांमधून दहा सदस्यांची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. आता अध्यापक गटातील प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये महाविद्यालय तसेच संस्थेतील दहा अध्यापक आणि विद्यापीठातून तीन अध्यापकांची नेमणूक केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्याशाखेच्या दोन अध्यापकांची विद्या परिषदेवर व महाविद्यालयातील तीन विभागप्रमुख प्रत्येक अभ्यास मंडळावर निवडून देण्यात येणार आहे.