पुणे – नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अवघ्या आठ दिवसांवर आल्या आहेत. राज्यभरात मतदार याद्यांमधील दुबार मतदारांच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार वा तिबार नावे असलेल्या मतदारांकडून हमीपत्र घेतले जाणार असून, त्यांनी एकाच मतदान केंद्रावर मतदान करणे बंधनकारक असणार आहे. पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये तब्बल १७ हजार ७४४ मतदारांची नावे दुबार असल्याचे आढळून आले आहे. या दुबार-तिबार मतदारांकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राध्यक्ष हमीपत्र घेतले जाणार आहे. या हमीपत्रात संबंधित मतदाराने एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचे नमूद करावे लागणार आहे. जर त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान केल्याचे आढळल्यास ते कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित विधानसभा मतदार यादीचा आधार घेतला जातो. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार केल्या जातात. या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामध्ये मतदारांची नावे समाविष्ट करताना दुबार आणि तिबार नावे आपोआप तपासली जातात व यादीत चिन्हांकित केली जातात. संभाव्य दुबार आणि तिबार मतदारांची नावे आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला या संकेतस्थळासाठी स्वतंत्र आयडी आणि पासवर्ड दिला आहे. त्याद्वारे संबंधित प्रभागातील किती मतदारांची नावे दुबार किंवा तिबार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. ….